Breaking News

आता अल्पवयीन मुलांनाही दुचाकीचा परवाना मिळणार?

मुंबई, दि. 28 - अल्पवयीन मुलांना आता 100 सीसींपेक्षा कमी क्षमतेच्या ‘नॉन गियर’ दुचाकी चालवण्याची परवानगी मिळणार आहे. यासंबंधी मोटार वाहन कायद्यात काही नव्या तरतुदी केल्या जाणार असून त्यात 16 ते 18 वयोगटातल्या मुलांना 100 सीसीपर्यंतच्या नॉन गियर दुचाकी चालवू देण्याची शिफारस केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने केली आहे.
यासंदर्भात प्रत्येक राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबतही नुकतीच चर्चा करण्यात आली. यावर कॅबिनेटकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या 16 ते 18 वयापर्यंतच्या मुलांना 50 सीसीपेक्षा कमी क्षमतेची नॉन गियर दुचाकी चालवण्याचा परवाना दिला जातो. सध्या 50 सीसी क्षमतेच्या दुचाकींचे उत्पादन जवळपास बंद झालेले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुचाकीचा वापर करता यावा, यासाठी 50 सीसी क्षमतेची अट शिथिल करण्याचा विचार सुरू आहे.