Breaking News

मराठा क्रांती मोर्चात महिलांनी सहभागी व्हावे : श्री. छ. सौ. दमयंतीराजे

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर मोठ्या प्रमाणात लोक आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. सातार्‍यात 3 ऑक्टोबर रोजी होणारा मराठा क्रांती मोर्चा हा मराठ्यांची राजधानी असलेल्या सातार्‍याला साजेसा असेल. महिलांचा मोर्चा सुरुवातीला असणार असल्यामुळे सातारा जिल्ह्यातून महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी केले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या महिला, जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीच्या सदस्या, नगरसेविका, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक जलमंदिर पॅलेस येथे झाली. यावेळी आयोजकांनी मोर्च्याच्या मार्गासह नियोजनाची संपूर्ण माहिती महिलांना दिली.
श्री. छ. सौ. दमयंतीराजे म्हणाल्या, कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात जिल्हा निहाय मूक मोर्चा काढून आपली ताकद दाखवत आहे. अत्यंत शिस्तबध्द व  शांतेत हे मूक मोर्चे निघत आहेत. छत्रपतींची राजधानी अशी सातारची ओळख आहे. त्याला साजेसा मोर्चा 3 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळेल. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नसून संपूर्ण महाराष्ट्रातून महिला, अबाल वृध्दांसह युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होत आहे. महिलांवरील होणारे अत्याचार हा गंभीर प्रश्‍न आहे. नवरात्रीच्या कालावधीत मोर्चा निघणार असून यावेळी बहुतांश महिला उपवास पकडतात. त्यामुळे सोबत खाण्याचे पदार्थ आणि पाणी सोबत घ्यावे. ते रस्त्यावर कोठे ही टाकून कचरा न करता स्वच्छता राखणे आपली जबाबदारी आहे. नियोजन समिती मोर्चासाठी उत्कृष्ठ नियोजन करत आहे. यावेळी तालुका निहाय महिलांचे ग्रुप बनवत एकमेकाला सहकार्य करत शांततेच्या मार्गाने मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. छ. सौ. दमयंतीराजे यांनी केले.