Breaking News

आमचा गणपती सोंडेचा कसा?

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 17 - बहुजन समाजाच्या भोळ्या भाबड्या श्रद्धेचा वापर करून मनुवाद्यांनी आपले धर्माचे दुकान नफ्यात आणले. आपला बहुजन समाज देव, धर्माच्या मुद्यावर फारच संवेदनशील आहे.
बहुजन आज सुशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित, उच्चपदस्थ झाले तरी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हायला तयार नाहीत. हजारो वर्षापूर्वी आमच्या अशिक्षित, अडाणी पिढीच्या मानसिकतेला धर्माची मोहीनी टाकून मनुप्रवृत्तीने गुलाम केले. अधूनमधून जेव्हा केव्हा आमच्या मधीलच एखादा समाज सुधारक आम्हाला या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा ही प्रवृत्ती त्यांच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी अशीच कुठली तरी क्लृपत्ती शोधून आगळीक करते. सुधारणा वाद्यांच्या विचारांचा मुडदा पाडण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशी किती तरी सुधारणावाद्यांनी बहुजनांना या मानसिक गुलामगिरीतून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळी याच प्रवृत्तींनी अतोनात छळ करुन खेळ केला. दुर्देवाने आमच्याच काही बांधवांनी त्या प्रवृत्तींना सढळ हाताने मदत केली हीच खरी शोकांतिका आहे. हजारो वर्षाच्या प्रदिर्घ अनुभवातूनही आम्ही काहीच शिकायला तयार नाही. देव-धर्माविषयी जरा कुठे खट झाले की कुठलीच शहानिशा न करता आम्ही एकमेकांच्या जीवावर उठतो. तेव्हा आपण सारी एकाच देवाची लेकरे ही महापुरुषांची शिकवणी विसरतो. आम्हा बहुजनांमध्ये असलेली नेमकी हिच हुकमी कमजोरी ओळखून नतद्रष्ट धर्मांध प्रवृत्ती खेळ करीत आहे. अंधेरीतील तो प्रकार याच खेळाचा महत्त्वाचा भाग आहे.
अंधेरीत आराससाठी बुद्ध मुर्तीच का निवडली? पहिली गोष्ट गणपती म्हणजे बुद्ध हे किती लोकांना ठाऊक आहे. ते कसे, ही गोष्ट प्रबोधनकार ठाकरे यांनी 60 च्या दशकातच स्पष्ट केली आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान हायजॅक करून गणपतीचे नवे रूप बहुजनांसमोर उभे केले. बुद्ध तत्त्वज्ञान यांच्या दुकानदारीवर प्रहार करणारे आहे. ही गोष्ट जाणल्यामुळेच गणाचा, गणपती तो बुद्ध झाकोळावा म्हणून हा काल्पनिक गणपती आपल्यासमोर उभा केला आहे. इतकेच नाही तर बुद्धांनी दुःख हरण करून सुखप्राप्तीसाठी सांगितलेले अष्टमार्ग, निष्प्रभ करण्याचा कुटील डावही खेळला गेला आहे. अष्टमार्गाचा नायक तो अष्टविनायक, दुःखाचे हरण करून सुखदेणारा म्हणून सुखकर्ता, दुःखहर्ता, अशा या अष्टविनायक सुखकर्ता दुःखहर्ता बुद्धांना हायजॅक करून हा नवा गणपती आपल्यसमोर उभा करण्याची भटखेळी आहे. राहीला प्रश्‍न हत्तीच्या सोंडेचा तर बुद्ध जन्माचे प्रतिक म्हणून हत्तीचा उल्लेख होतो. गणपतीला हत्तीची सोंड लावून इथेही विडंबनाची परिसिमा गाठली. याच कपटी इतिहासाची पुनरावृत्ती अंधेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली. बुध्दमुर्तीच का? इतर कुठलेच देवदेवता नव्हते का? महापुरुष नव्हते का? होय! त्यांना विद्यमान सामाजिक परिस्थितीचा नेमका फायदा लाटायचा आहे. त्यासाठी त्यांना मिळेल ती संधी साधायची आहे. कोपर्डी प्रकरणावरून मराठा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. त्याचवेळी याच कुटील शक्तींनी बहुजन समाजातीलच काही गद्दारांना हाताशी धरून फुटीचे विष पेरून बहुजन समाजातील मराठा आणि दलित समाजात मतभेदांची भिंत उभी केली आहे. एकाच ताटात जेवणारे हे दोन्ही भाऊ तेच ताट उचलून एकमेकांच्या डोक्यात घालण्यासाठी ओढाताण करीत आहेत. अशा परिस्थितीत अंधेरीचे खेळ खेळून या आगीत तेल ओतण्याचा हा नतद्रष्टपणा आहे. बहुजनांनो! आस्तिक असा नाही तर नास्तिक हे महत्वाचे नाही पण आमचा गणपती सोंडेचा नाही असेलच तर महादेवासारख्या मानवी चेहरा असलेलाच असेल हे पक्के लक्षात ठेवा. म्हणजे कुटील खेळींना शह देणे सहज शक्य होईल.