Breaking News

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेच्या यादीत भारत 39 व्या स्थानी

नवी दिल्ली, दि. 29 - जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्पर्धात्मक यादीत भारताने 16 स्थानांची झेप घेत 39 वे स्थान मिळवले आहे. जागतिक स्पर्धात्मक यादीत झपाट्याने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेच्या रूपात भारत समोर आला आहे. या यादीत पाकिस्तान 122 व्या क्रमांकावर आला आहे. तर दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान शेवटच्या क्रमांकावर आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये भारतानंतर श्रीलंका 71 व्या, भूतान 97 व्या, नेपाळ 98 व्या तर बांगलादेश 106 व्या क्रमांकावर आहेत.
जागतिक स्पर्धात्मक यादीत भारताची गुणसंख्या 4.52 इतकी आहे. तर पहिल्या क्रमांकाच्या देशाची गुणसंख्या 5.81 इतकी आहे. सलग आठव्या वर्षीही या यादीत स्वित्झर्लंडने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. दुस-या स्थानावर सिंगापुर तर तिस-या स्थानावर अमेरिका कायम आहेत. या यादीतील भारत हा असा एकमेव देश आहे ज्याने या क्रमावारीत एकावेळी 16 क्रमांकांची झेप घेतली असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासारख्या गोष्टींचा विचार या यादीतील क्रमवारी निश्‍चित करण्यासाठी केला जातो.