महा-अभियान महोत्सवासाठी सर्वांनी सक्रीय व्हावे
। अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांचे आवाहन । महा-अवयवदान अभियान समितीची बैठक संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)। 27 - महाअवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. सध्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्याआधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. राज्यभरात सुमारे 12 हजार पेक्षा अधिक रुग्ण किडणी, लिव्हर, लंग्ज, हार्ट, त्वचा इत्यादी अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यासाठी शासनाने महा-अवयवदानाचे महोत्सव हाती घेण्याबाबत सूचित केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात महा-अभियान महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महा-अवयवदान अभियानांतर्गत जिल्हयातील महा-अवयवदान अभियान समिती मध्ये निवड झालेल्या समिती सदस्यांची बैठक अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती सुरेखा कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. सोनवणे, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. साळुंखे, साई सुर्य नेत्रसेवेचे श्री. चौधरी, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. एन. जी. बकाल, जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख आदी उपस्थित होते.
येत्या 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यात महाअवयवदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयामार्फत दि. 30 ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून या रॅलीचा प्रारंभ जिल्हा रुग्णालय प्रांगणातून सकाळी 8.00 वाजता होईल. रॅली अप्पु हत्ती, न्यु आर्ट, कॉमर्स कॉलेज, दिल्लीगेट, चितळेरोड, कापडबाजार, सर्जेपूरा मार्गे जिल्हा रुग्णालयात सांगता होईल. दिनांक 31 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयांमधून रांगोळी, वकृत्व निबंध स्पर्धा, अवयवदान नोंदणी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तर 1 सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर, अवयवदान नोंदणी शिबीर, तसेच या अभियानात काम करणा-यांचा व अवयवदात्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रारंभी नेत्रदान समुपदेशक श्री. सतिश आहेर यांनी मानसिक व शारीरीक आरोग्य सक्षम असलेल्या 18 वर्षावरील व्यक्ती जिवंतपणी शरिरातील जोडीने असलेल्या अवयवांपैकी एक अवयव डोळे, मूत्रपिंड, स्वादूपिंड, आतडी, यकृत, त्वचा, फुफ्फुसे, ह़्रदय, ह़दयाच्या झडपा, कानाचे पडदे व हाडे अशी एकूण 11 अवयावांचे दान करु शकतात. यासाठी अवयव प्रत्यारोपण केंद्राशी संपर्क साधून अवयवदाता व लाभार्थी पेशंट या दोघांनी एकत्रीतपणे कायद्यानुसार आवश्यक फार्म भरणे आवश्यक असल्याचे सांगितले. अवयवदानाबाबत फॉर्म क्रमांक 5 त्या बाबतची माहिती पत्रके ऊचएठ.जठॠ या शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातही याची माहिती मिळू शकेल.
