Breaking News

अमरापूरचा सर्वांगिण विकास निश्‍चितच कौतुकास्पद

शेवगाव (प्रतिनिधी) । 27 - स्मार्ट व्हिलेज, अमरापूर (ता.शेवगाव) येथे सांडपाण्याचा पुनर्वापर, डिजिटल शाळा, रस्ते, मीटरद्वारे 24 तास पाणी पुरवठा, मोफत वायफाय नेटवर्क अशा विविध पातळ्यांवर होत असलेला सर्वांगिण विकास निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असे सांगत गावाच्या सुरक्षिततेसाठी रेणुकामाता पतसंस्थेकडून संपूर्ण गावामध्ये येत्या आठ दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याची घोषणा रेणुकामाता पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव यांनी केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भालेराव यांच्याकडून एल.ई.डी. प्रोजेक्टर भेट देण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.गणेश चेके उपस्थित होते. तसेच सरपंच विजय पोटफोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, ग्रामसेवक अण्णासाहेब नजन, रो.डॉ.पुरुषोत्तम बिहाणी, डॉ.वैद्य, डॉ.गवळी, विजय कळमकर, दामुअण्णा काकडे उपस्थित होते.
शाळा हे भविष्यातील नागरिक घडवण्याचे ठिकाण असल्याचे सांगत भालेराव यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ.गणेश चेके म्हणाले, रोटरी क्लबने शाळा दत्तक घेतली असून, आमच्या प्रत्येक भेटी दरम्यान आम्ही शाळेला काहीतरी नवीन देणार असल्याचे सांगत शाळेला हॅण्ड वॉश स्टेशन देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. केंद्रप्रमुख बागडे यांनी शाळेला ब्रॉडबॅण्ड कनेक्शन देत असल्याचे सांगितले तसेच रो.डॉ.गवळी यांनी शाळेसाठी स्वखर्चातून वर्षभरासाठी वर्तमानपत्र सुरु करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक घुले, धनवडे सर, राऊत मॅडम व इतर शिक्षक तसेच माजी सरपंच सुरेशनाना चौधरी, बाबासाहेब पोटफोडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सुसे, काकासाहेब म्हस्के, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. त्याचप्रमाणे महेश लाडणे, रवींद्र बोरुडे, सुभाष अडसुरे, धनंजय खैरे, अशोक पोटफोडे, संभाजी वाघ, दत्ता खैरे, सोमनाथ सुसे, बंडू सुसे, संभाजी काळुसे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरुडे यांनी तर आभार संतोष ढाकणे यांनी मानले.