Breaking News

पोलिसांच्या ताकिदला झुगारुन डीजे वाजला

। जिल्ह्यात दहीहंडी उत्सव विविध उपक्रमांनी साजरा । शहरात मुंबईच्या गोविंदाची बाजी । गांधी मैदानात गालबोट लागले

अहमदनगर (प्रतिनिधी) । 27 - जिल्हा पोलिस प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार डिजे वाजविण्यासाठी व लावण्यासाठी बंदी घातली होती. आवाजाची मर्यादा ओलांडल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील, अशी ताकीद देण्यात आली होती. मात्र, पोलिस प्रशासनाने दिलेली ताकीद झुगारुन, न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसून काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे वाजविला. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या मंडळावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांच्या चर्चेतून समजली.
सर्व मंडळाच्या दहिहंडीचे व्हिडीओ रेकॉर्डींग पोलिसांनी केले आहे. दहिहंडी उत्सवावर विरजन नको, तसेच डीजे जप्त केल्यानंतर मंडळ परिसरातील शांतता धोक्यात येईल, या पार्श्‍वभुमीवर पोलिस ठाण्यातील गोपीनीय शाखेच्या कर्मचार्‍यांनी संपुर्ण माहिती एकत्रित करुन वरीष्ठ अधिकार्‍यांना अहवाल सादर केला आहे. वरीष्ठांच्या आदेशानुसार नियम मोडलेल्या मंडळाच्या अध्यक्षासह डिजे चालकावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अनेक मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दहिहंडी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
शहरातील दहिहंडी फोडण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद सह नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून गोविंदा पथके नगरमध्ये दाखल झाली होती. बहुतांशी दहिहंडया मुंबईच्या गोविंदा पथकाने फोडल्या. गांधी मैदान येथील दोन गटातील हाणामारीची घटना वगळता दहिहंडी उत्सव शांततेत पार पडला. गांधी मैदानातील हाणामारीने उत्सवाला गालबोट लागले.दहिहंडी उत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर शहरात सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यात मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाच जास्त म्हणजे 194 मंडळांनी दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. शहरात तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात तर कोतवालीच्या हद्दीत पाच ठिकाणी दहिहंडी उत्सव होता. कोतवाली हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रेरणा प्रतिष्ठाणच्या दहिहंडी उत्सवात तरुणाईने मोठी गर्दी केली होती. हीच दहिहंडी सर्वांचे आकर्षण ठरली. राष्ट्रवादीचे आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठाणने दहिहंडी उभारली होती. दहिहंडी उत्सवासाठी सिनेअभिनेत्री हीने हजेरी लावली. मुंबईच्या जय भगवानबाबा दहिहंडी ग्रुपने फोडली. सर्वाधिक 1 लाख 11 हजार 111 रुपयाची बक्षिस पटकावले. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली होती. याच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील नवीपेठचा राजा, चौपाटी कारंजा, शिवभक्त युवाप्रतिष्ठाण, दिल्लीगेट मंडळाच्या दहिहंडीचे आकर्षण होते. उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात पारंपारीक पध्दतीने दहिहंडी उभारण्यात आली होती. यावेळी ढोल ताशांचे पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले होते.
जिल्ह्यात अनुक्रमे 194 मंडळानी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. यात शिर्डी-66, श्रीगोंदा-5, सोनई-6, सुपा-9, घारगाव - 6, शिंगणापूर-3, शेवगाव-3, श्रीरामपूर-5, अकोले - 8, राजूर - 6, नेवासा - 18, कोपरगाव- 4, पाथर्डी-2, पारनेर - 6, राहाता-6, राहुरी - 34, जामखेड -4, व शहरातील 12 मंडळाचा समावेश होता.