पाटणा पायरेट्सला सलग दुसर्यांदा विजेतेपद
महिलांच्या लीगमध्ये स्टॉर्म क्वीन्सला विजेतेपद; पुणेरी पलटण तीसर्या स्थानी
हैदराबाद, दि. 01 - प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पाटणा पायरेट्सने सलग दुसर्यांदा जेतेपद राखले असून जयपूर पिंक पँथर्स मात्र निराशा हाती आली आहे. पहिल्या मोसमातील विजेत्या जयपूर पिंक पँथर्सचा 37-29 असा पराभव करून सलग दुसर्यांदा प्रो कबड्डीत विजेतेपदाचा करंडक उंचावण्याचा पराक्रम केला. प्रदीप नरवालच्या निर्णायक चढाया दोन्ही संघांतला फरक स्पष्ट करणार्या ठरल्या. प्रदिप नरवालने एकून 16 गुणांची कमाई केली.गेल्या मोसमात सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून ठसा उमटवणार्या प्रदीप नरवालने यंदा आपण मौल्यवान खेळाडू आहोत, हे सिद्ध केले. त्याने 25 चढाया केल्या. त्यातील 16 चढाया यशस्वी होत्या, तर केवळ दोनदाच त्याच्या पकडी झाल्या.
पाटणाकडे राजेश मोंडल आणि सुरजित असे आणखी दोन चढाईपटू होते; पण सामन्याच्या पहिल्या चढाईत पकड होऊनही जयपूरने पाटणाची पहिल्याच चढाईत पकड केली तरीही न डगमगता प्रदीप नरवालने कमालीचा खेळ केला. मध्यांतरानंतर तर तो पटणाकडून एकटाच चढाया करत होता आणि त्याला रोखणे जयपूरच्या खेळाडूंना जमले नाही. मध्यांतराच्या 19-17 अशा आघाडीनंतर प्रदीपने गुणांचा सपाटाच लावला. संपूण सामन्यात जयपूर पिंक पँथर्सवर दोनदा लोण चढवत पाटणा पायरेट्सने सामना 37-29 असा जिंकून विजेतेपद पुन्हा आपल्याकडे राखले. प्रदीप नरवाला सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तर टायटन्सचा राहुल चौधरी बेस्ट चढाईपटू तर पाटणाचा फजल अत्राचली याला बेस्ट बचावपट्टूचा मान मिळाला.
दरम्यान तीसर्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात कर्णधार तसेच अनुभवी रविंदर पहल मनजित चिल्लरच्या यांच्या अनुपस्थितीत खेळणार्या पुणेरी पलटणने घरच्या मैदानावर खेळणार्या तेलुगू टायटन्सचा 40-35 असा पराभव करून तिसरा क्रमांक मिळवला. यंदाच्या मोसमात स्टार चढाईपटू आणि चढायांचे शतक पार करणार्या राहुल चौधरी (18) आणि दीपक हुडा (17) या दोन खेळाडूंत झालेल्या सामन्यात दीपकचा पुणे संघ भारी ठरला. सामन्याच्या सुरवातीसच तेलुगूवर लोण देणार्या पुण्याने मोठी आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर राहुलने झोकून दिले आणि भराभर गुणांची वसुली सुरू केली. उत्तरार्धात पुण्यावर दोन लोण पडले. त्यामुळे तेलुगूने 27-22 अशी आघाडी घेतली होती; मात्र त्यानंतर दीपक हुडाचा करिष्मा सुरू झाला आणि तेलुगूवर लोण दिला. तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला.
महिलांच्या पहिल्याच लीगमध्ये अतितटीच्या लढतील कर्णधार तेजस्विनी बाईने अखेरच्या निर्णायक चढाईत दोन गुण मिळवत फायर बर्ड्सच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला आणि स्टॉर्म क्वीन्सला एका गुणाने रोमहर्षक विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारी साक्षी कुमारी चढायांचे 6 आणि पकडींचे 2 गुण स्टॉर्म क्वीन्सच्या विजयाची शिल्पकार ठरली.
पहिल्या सत्राच्या सुरुवातीला साक्षी कुमारीने एका चढाईत तीन गुण मिळवण्याची साधत क्रीडारसिकांची वाहवा मिळवली. मात्र त्यानंतर स्टॉर्म क्वीन्सच्या तेजस्विनी आणि ज्योतीची फायर बर्ड्सने ‘सुपर टॅकल’ करून गुणांचा सपाटा लावला. त्यामुळे मध्यंतराला फायर बर्ड्सकडे 10-8 अशी दोन गुणांची आघाडी मिळवली.
दुसरे सत्र मात्र विलक्षण रंगतदार ठरले. सातव्या मिनिटाला स्टॉर्म क्वीन्सने लोण चढवत 18-12 अशी आघाडी घेतली होती. पण सामन्याला तीन मिनिटे असताना रिंजू के. हिने एका चढाईत तीन गुण मिळवत सामन्याचे चित्र पालटले. शेवटच्या मिनिटाला फायर बर्ड्सने स्टॉर्म क्वीन्सवर लोण चढवत 23-22 अशी आघाडी मिळवली. मात्र शेवटच्या चढाईने विजेतेपद त्यांच्याकडून निसटले. स्टॉर्म क्वीन्सच्या तेजस्विनीनेही अष्टपैलू खेळ केला. सोनाली इंगळेने पकडींचे चार गुण मिळवले. फायर बर्ड्सकडून रिंजू के. हिने चढायांचे सात गुण मिळवले, तर किशोरी शिंदेने पकडींचे चार गुण मिळवले.
Post Comment