दुसर्‍या दिवस अखेर भारत 5 बाद 358

किंग्सटन, दि. 01 - भारत आणि विंडीज यांच्यात सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटीत भारत दुसर्‍या दिवसअखेर मजबूत स्थिती पोहचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात लोकेश राहुलनं शानदार फलंदाजीच्या जोरावर शतक झळकावत 158 धावांची खेळी केली. पहिल्या डावात यजमानांच्या 196 धावांचा पाठलाग करताना भारतानं उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत 125 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 358 धावा केल्या. त्यामुळे भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध 162 धावांची आघाडी घेतली.
राहुलच्या शतकी खेळीमुळे दुसर्‍या कसोटीत भारताची पकड मजबूत झाली आहे. राहुलनं 303 चेंडूंत 15 चौकार आणि 3 षटकारांसह 158 धावा केल्या. तर पुजारा 46 धावांवर बाद झाला आहे. या सामन्यात राहुल आणि पुजारानं सर्वाधिक 121 धावांची भागीदारी केली आहे. मुरली विजय दुखापतग्रस्त असल्यानं संघात स्थान मिळालेल्या राहुलने संधीचा अचूक लाभ घेत चांगली कामगिरी करत 58 चेंडूंत अर्धशतक झळकावले.