Breaking News

आजचा विद्यार्थी आदर्श विद्यार्थी बनला पाहिजे ः अनिल राठोड

अहमदनगर, दि. 11 - आज-कालच्या विद्यार्थ्यांना दिशा देण्याची गरज आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन महत्वाचे आहे.जसे आदर्श युवक मंडळ आहे. त्याप्रमाणेचे आजचा विद्यार्थी हा आदर्श बनला पाहिजे. शिवसेनेच्यावतीने विद्यार्थी मार्गदर्शन शिबीराच्या माध्यमातून असे आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी आम्ही निश्‍चित प्रयत्न करु, असे प्रतिपादन उपनेते अनिल राठोड यांनी केले.
आदर्श युवक मंडळाच्यावतीने इ.10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपनेते अनिल राठोड व महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, मंडळाचे अध्यक्ष, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, प्रा.मकरंद खेर, बंडोपंत क्षीरसागर, नगरसेवक योगीराज गाडे,स्नेहा रानडे, राजु गायकवाड, संजय गेनप्पा, डॉ.पुंडे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना राठोड म्हणाले की, आदर्श युवक मंडळाच्यावतीने फक्त विद्यार्थ्यांचे सत्कारच होत नाही तर वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती घेतली जातात. या परिसरात डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक, वकिल अशीच आदर्श लोक या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतं. शिवसेना ही आश्‍वासने देत नाही तर वचन देते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय मनाशी बाळगले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, सध्या शैक्षणिक युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.  गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडू शकतो व त्यास योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास त्याची दिशा आपोआप मिळू शकते. सध्याचं युग हे स्पर्धेचे युग असून, या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करावे लागते. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल आम्ही त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारुन आणखी प्रोत्साहान देतो.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, प्रा.मकरंद खेर, डॉ.स्नेहा रानडे यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष व उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा यांनी प्रास्तविकात सांगितले की,  विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी व हिंमतीने पुढे जाण्याची क्षमता असेल तर तो निश्‍चितपणे यशस्वी होतो.  विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश म्हणजे भविष्याची चांगली सुरुवात आहे. इ.10 वी व 12 वी या दोन्ही परिक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देऊन जाणार्‍या आहेत. त्यामुळे 10 वी व 12 वी नंतर विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन आपली दिशा निवडली पाहिजे, असे सांगितले.