अ.भा.मराठा सेवा संघ पंतप्रधानांना भेटणार
। संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांची पत्रकार परिषदेत माहिती । मेटेंनी शिवस्मारक समितीचा राजीनामा द्यावा ः सुनील मोरे
अहमदनगर, दि. 11 - मराठा आरक्षण समितीच्या वतीने रविवारी अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्व सामाजिकसंस्थांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. याबैठकीस विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना महाडिक म्हणाले की, मराठा आरक्षण समितीच्या वतीने लवकर औरंगाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटणार आहोत.यावेळी पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक म्हणाले की, आजची बैठक ही महत्त्वाच्या तीन प्रश्नांवर आयोजीत करण्यात आली असून यामध्ये मराठा समाजाला आरक्षण, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची पुर्णस्थापना करुन यावर मराठा संघटनांचे पदाधिकार्यांची नियुक्ती करणे तसेच शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करणे आदि प्रमुख मागण्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सध्या शासन अनुकुल असुन लवकरच आम्ही या प्रश्नावर पंतप्रधान यांना भेटुन चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यानंतर शंभुराजे युवा क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल (बप्पा) मारे यांनी बोलताना सांगीतले की,विनायक मेटें म्हणजे मराठा समाज नाही, विनायक मेटे यांनी सतत स्वतःवर अन्याय झाल्यावर मराठा समाजावर अन्याय झाला असे सांगण्यापेक्षा आता मराठा आरक्षण समिती आणि शिवस्मारक समिती सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अन्यथा मेटे यांना भविष्यात मराठा समाज माफ करणार नाही, मराठा समाजाने मेटे यांना साथ दिली मात्र त्यांनी समाजाच्या प्रश्नांवर कधीच आवाज उठवला नाही अशी खंत बप्पा मोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी मराठा समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, अखिल भारतीय मराठा सेवासंघाचे कृषीराज टकले, बाळासाहेब पठारे, महानगरपालिकेचे नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे पाटील, अविनाश माने, सुभाष गाढवे, अजय जगताप, महेश निंबाळकर, हनुमंत शेळके, सुभाष जावळे, सुरेश काकडे, नितीन शेळके, स्वाभिमानी संघटनेेचे जिल्हाध्यक्ष प्रविण बोलभट, अखिल भारतीय मराठत्त युवा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण आदि उपस्थित होते.
