तेलुगू टायटन्सचा पहिला विजय
पुणेरी पलटण बुल्सकडून पराभूत
हैद्राबाद, दि. 05 - प्रो कबड्डी लीग हैद्राबादच्या तीसर्या दिवशी चाहत्यांचा दमदार पाठिंबा लाभलेल्या तेलुगू टायटन्स संघाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत घरच्या मैदानावर बंगाल वॉरियर्सवर 35-18 असा विजय मिळवत पहिल्या विजयाची नोंद केली. तर पहिल्या लढतीत पुणेरी पलटण बंगळुरू बुल्स यांच्यात झालेल्या चढउतार सामन्यात रोहित कुमारच्या सुपर चढाईमुळे पुण्याच्या हातात आलेला सामना सामना 27-29 असा गमावला.झंझावाती आक्रमणासह खेळणार्या तेलुगू टायटन्स संघाने 7 व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सवर लोण चढवत 9-1 अशी भक्कम आघाडी मिळवली. नितीन मदनेच्या दमदार चढायांच्या बळावर बंगाल वॉरियर्सने पिछाडी भरून काढली. मात्र तरीही तेलुगू टायटन्स संघाने मध्यंतराला 15-8 अशी आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतरही टायटन्स संघाने आक्रमण कायम राखत बाजी मारली. चढाईत 10 गुणांची कमाई करणारा कर्णधार राहुल चौधरी तर बचावात संदीप धुल हायफाई 6 गुणांची कमाई करणारे टायटन्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पहिल्या लढतीत पुणे आणि बंगळुरू लढतीत, अमित राठी व रोहित कुमार यशस्वी चढायांच्या बळावर बंगळुरूने मध्यंतराला 10-8 अशी निसटती आघाडी घेतली. तसेच सर्वात महागाडा खेळाडू मोहित चिल्लर याने बचावात 8 गुणांची कमाई केली. मोहित-सुरेंदर या कोपरा रक्षकांनी सुदंर बचाव केला. 15-15 बरोबरी असताना पुण्याच्या नितीन तोमरने यशस्वी चढाई करताना संघाला तीन गुण मिळवून दिले. मनजीत चिल्लरने पुण्याला 20-16 अशी आघाडी मिळवून दिली. पुण्याच्या भरवशाच्या नितीन तोमरची पकड करत बंगळुरूने 22-21 वाटचाल केली. पुण्याने दीपक पुनियाची पकड करत 22-22 अशी बरोबरी केली. मनजीतने यशस्वी चढाई करत संघाला 23-22 आघाडी मिळवून दिली. पुण्याने बंगळुरूवर लोण चढवत 26-23 अशी आगेकूच केली. बंगळुरूने मनजीतची पकड करत पिछाडी भरून काढली. बंगळुरूने यशस्वी चढाईच्या बळावर 25-26 अशी वाटचाल केली. बंगळुरूच्या रोहित कुमारने भन्नाट चढाईत पुण्याच्या तीन खेळाडूंना बाद केले आणि संघाला 28-27 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. शेवटच्या चढाईत आणखी एक गुण मिळवत रोहितने बंगळुरूच्या 29-27 असा विजय मिळवून दिला.
