Breaking News

काश्मीरमधील सुरक्षेचा प्रश्‍न !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग, मात्र ईशान्येकडे जसे दुर्लक्ष झाले, तसेच ते काश्मीरकडे सुध्दा झाले, त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पाळेमुळे खोलवर  रूजली आहे, ती पाळेमुळे खणण्यासाठी आपल्याला आता जड जात आहे. काश्मीरमुद्दा हा आज उद्भवलेला प्रश्‍न नसून, स्वातंत्र्याबरोबरच आपल्याला मिळालेली  एक समस्या आहे, ज्यातून तोडगा काढण्यासाठी कोणत्याच सरकारने खंबीरपणे पाऊल टाकले नाही, की ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळेच हिसांचार वाढच  चालला आहे, अनेंक दहशतवादी तयार होत आहे, काश्मीरच्या जनतेचे जनजीवन विस्कळीत होत चालले आहे‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात  दहशतवादी बुरहाण वणी याला ठार केल्यानंतर काश्मीर खोर्‍यामध्ये उफाळलेला हिंसाचार हा भयानक होता. यात जमावाकडून काही ठिकाणी पोलिसांच्या  वाहनांना आग लावल्याच्या, तर पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याच्याही घटना घडल्या, तर काही पोलिसांच्या ऑटोमेटिक रायफल्स पळवण्यात  आल्या. काश्मीर खोर्‍यात गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 34 वर पोचली आहे. यावरून काश्मीरमधील भयानक  वास्तव्याची कल्पना येते. विशेष म्हणजे दहशतवादी बुरहाण वाणी ठार केल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला 20 हजारापेक्षा जास्त समुदाय जमतेा, ते देखील  संचारबंदी असतांना, पोलिसांना, सैन्याला न जुमानता, यावरून काश्मीरचा प्रश्‍न गंभीर बनला असून, तेथील जनमत देखील दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत  असल्यासाखेच दिसून येत आहे. बुरहाण वणी हा दहशतवादी नसून लोकनेता होता, म्हणून पाककडून हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उपस्थित करण्यात  अर्थात  भारताकडून देखील त्याला जोरदार प्रत्यत्तर देत, इतरांची भूमी हडपण्याच्या उद्देशार्थ दहशतवादाचा वापर देशाचे धोरण म्हणून करणार्‍या पाकिस्तानकडून  दहशतवाद्यांच्या तत्त्वांस उत्तेजन करण्यात येते,‘ असे खडे बोल भारताचे संयुक्त राष्ट्रसंघामधील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी पाकला सुनावले. असे असले तरी  पाकला फक्त सुनावून चालणार नाही तर, आज काश्मीर प्रश्‍नावर केंद्रसरकारने ठोस कार्यक्रम हातात घेण्याची गरज आहे. मोदी सरकार परदेश दौर्‍यावरून  आल्यानंतर पाचव्या दिवशी उच्चस्तरीय समितीची बैठक बोलवतात. यावरून केंद्र सरकारची उदासिनता, काश्मीर परिस्थितीमध्ये काहीही बदल न करता, जैसे थै  परिस्थितीमध्ये ठेवायचे अशीच मानसिकता दिसून येत आहे. आत काश्मीरमध्ये भाजपाचे संयुक्त सरकार आहे. हे विशेष, त्यामुळे भाजपाकडून ठोस कृतीची गरज  आहे. पाकिस्तान नेहमीच दहयतवाद्यांना आश्रय, आणि रसद पुरवतो, हे वेळोवेळी सिध्द झाले आहे, तरी पाकच्या मैत्रीला एकीकडे गोजांरायचे आणि दुसरीकडे  असे हल्ले सहन करायचे असा आपला एककलमी कार्यक्रम सुरू आहे. अमरनाथ यात्रासाठी जाणार्‍या भाविकांना तर हक-नाक त्रास सहन करावा लागत आहे,  कायदा सुव्यवस्था तर विविध राज्यातून गेलेल्या भाविकांना दिसत नाही.त्यामुळे काश्मीरमध्ये आता विकासासाबरोबर तेथील स्थानिक जनतेलापण आम्ही  तुमच्यासोबत आहोत, तुम्ही तुमचे जीवन, योग्यपध्दतीने, सुरक्षित जगु शकतात, हा विश्‍वास निर्माण करावा लागणार आहे, तेव्हाच कुठे काश्मीरमध्ये पसरलेले  दहशतवाद्यांची पाळेमुळे उखडून फेकणे शक्य होईल, अन्यथा 2-3 महिने झाले की, दहशतवाद, अनेकाचे जीव जाणे हे नित्याचेच होईल.