लढा हा विचारानेच जिंकता येतो
हिंदू बहुजन समाजाला आपला देदीप्यमान इतिहासाचे स्मरण करुनच नव्हे तर ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षातील डावपेचांचाही अभ्यास करावा लागेल. कोणताही लढा एकमेकांवर बंदूकीच्या नळ्या उगारुन किंवा शस्त्रे काढून जिंकता येत नाही. युध्द किंवा लढाया अशा प्रकारे जिंकता येऊ शकतीलही, परंतु लढा हा वैचारिक डावपेचांनीच जिंकावा लागतो. त्यात ब्राह्मणी संस्कृती तर त्यांच्या चाणक्य नीतीच्या डावपेचांनी सज्ज आहे. ब्राह्मणी संस्कृती आज राजकीय सत्तेवर आल्यामुळे या परिस्थितीला त्यांनी निर्णायक आणि विजयी लढ्यात रुपांतरीत कारण्याचे डावपेच आखले आहेत. त्यामुळेच इतिहासाचे भान नसलेले हिंदू बहुजनही तितक्याच आक्रमकपणे आपले कार्य रेटीत आहेत. परंतु हा लढा वैचारिकतेने लढण्याचे बळ हिंदू बहुजनांकडे अधिक आहे. ब्राह्मणी संस्कृती वैचारिक लढ्यात टिकत नसल्यामुळे ते निर्णायक क्षणी इतर मार्गांचाही वापर करण्यास धजावतात. संख्याबळ आणि नैतिकता या दोहोंचा त्यांच्या संस्कृतीकडे अभाव आहे. अर्थात हे देखील तितकेच सत्य आहे की, जातीपूर्व समाजव्यवस्थेत तळाला गेला आहे तो समाज यासाठी निसर्गत: आघाडीवर असतो. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू बहुजन समाजाला संवैधानिक हक्कातून शिक्षणाचा अधिकार मिळाला त्यामुळे तो आपली संस्कृती जाणतो. त्याचप्रमाणे आपला इतिहासही त्याला ज्ञात आहे; परंतु व्यवस्थेत उत्थान साधण्यासाठी त्यांच्या संस्थात्मक संस्कृतीला उभे करता आले नाही. हिंदू बहुजनांच्या संस्थात्मक संस्कृतीला उभे करण्यात अद्याप यश आले नाही. ही अभावाची परिस्थिती ओळखूनच ब्राह्मणी संस्कृतीने त्यांच्या संस्था उभ्या केल्या. त्यांची संस्थात्मक उभारणी आदीवासी समुदायापासून तर वारकरी संप्रदायापर्यंत त्यांनी बेमालूमपणे उभारली. मूळ वारकरी संप्रदायापासून ब्राह्मणी संस्कृतीचे उदोउदो करणारा वारकरी संप्रदाय यामध्ये नेमका काय बदल आहे हे हिंदू बहुजनांना सामान्यपणे उमगत नाही. यासाठी प्रबोधनाच्या चळवळीचे सातत्य असावे लागते. परंतु प्रबोधनाच्या चळवळी या साधनांचा अभाव असणार्या असल्यामुळे प्रस्थापित प्रसारमाध्यमे त्यांच्या मोठ्या कार्याची छोटी दखलही घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तीशी संपर्क करुन ही चळवळ उभी केली जाते. आज केवळ तीस टक्के मतदानावर ब्राह्मणी संस्कृती या देशाला विषमताग्रस्त बनवू पाहत आहे. परंतु सत्तर टक्के समाज हा आपल्या अस्मिता घेवून जागृत झाला आहे. मात्र त्यासाठी तो समान विचारांनी गुंफला असला तरी एकाच छताखाली नाही. याउलट ब्राह्मणी संस्कृती ही एकाच छताच्या विचारांनी अनेक छत उभे करते व त्यांचे नियंत्रण हातात ठेवते. कोणी हाताबाहेर गेला की त्याला योग्य तो रस्ता दाखविला जातो. तर हिंदू बहुजनांच्या संघटनांमध्ये लोकशाही दृढमूल झाल्यामुळे ते आपली वैचारिक मतभिन्नता मांडण्याचे स्वातंत्र्य घेतात. स्वातंत्र्यामय संस्कृतीत गेली सात दशके वावरणार्या भारतीय समाजाला गोबेल्स तंत्राने विषमताग्रस्त संस्कृतीच्या जोखडाखाली आणणे कठीण आहे. परंतु शेवटी हा लढा संत्ता संघर्षाच्याही मार्गातून जात असल्याने संविधानाने दिलेले राजकीय स्वातंत्र्य ही हिंदू बहुजनांना परिवर्तनवादी प्रवाहाकडे न्यावे लागेल. हाच हिंदु बहुजनांना खरा संदेश ठरेल!
