Breaking News

सिव्हील रस्त्यावरिल अतिक्रमणे हटविली

सांगली, दि. 23 - राममंदिर ते सिव्हील रुग्णालय रस्त्यावर गेल्या 20 वर्षांपासून खोकीधारकांनी केलेले अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने हटविले. चौकातील अतिक्रमण केलेले फूटपाथ, पाच भलीमोठी खोकी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी अधिकार्‍यांबरोबर अतिक्रमण धारकांनी वाद घातल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर वीज वितरणच्या कर्मचार्‍यांना बोलावून खोक्यांचे वीज कनेक्शन बंद करुन कारवाई पूर्ण करण्यात आली.
महापालिकेचे आयुक्त रविंद्र खेबूडकर यांनी शहरातील अतिक्रमण निर्मूलन, स्वच्छता, चौक सुशोभीकरण यावर भर दिला आहे. चौकातील अतिक्रमणे तातडीने हटवा, अतिक्रमण काढताना एखाद्याने न्यायालयातून स्थगिती मिळविल्यास संबंधित अधिकार्‍याला निलंबित करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला होता. दुपारी सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, अभियंता परमेश्‍वर हलकुडे, बांधकाम विभागाचे अभियंता डी. डी. पवार, नगररचना अधिकारी वैभव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणविरोधी पथक राममंदिर चौकात आले. त्यांनी राममंदिरपासून सिव्हीलपर्यंतच्या 60 फुटी रस्त्यावरील अतिक्रमित खोकी, फुटपाथ हटविण्यास सुरुवात केली. अतिक्रमणविरोधी पथकाने राममंदिर चौक ते सिव्हील रोडवरील डाव्या बाजूची अतिक्रमणे हटविली होती. डाव्या उजव्या बाजूला एका बेकरीने रस्त्यावर पेव्हिंग टाकून चार फुटाच्या वर केलेले अतिक्रमण फोडून काढले. रस्त्यावर ड्रेनेज विभागाचा बंद पडलेला ओव्हर फ्लो खांबही हटविला. त्यानंतर डाव्या बाजूची खोकी हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
डाव्या बाजूची खोकी हटविताना तत्कालीन सांगली नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती मठद यांनी थोडा विरोध केला. कारवाई थांबवा, खोकी काढून घेतो, अशी विनंती केली. पुढच्या दोन खोकीधारकांनीही अधिकार्‍यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. आधी ते खोके हटवा, मग आमची हटवा, असे म्हटल्याने तणाव निर्माण झाला. तेव्हा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांनी वीज वितरणच्या कर्मचार्‍यांना बोलावून या सर्वच खोकीधारकांचा वीज पुरवठा खंडित केला. महापालिकेच्या पथकाने विरोध झुगारुन ही खोकी जेसीबी लावून हटविली.