Breaking News

मुंबईत आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बैठकींना जोर

मुंबई, दि. 11 - दादरमधील ‘आंबेडकर भवन’ एका रात्रीत जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ तसेच या प्रकरणाबाबत फडणवीस सरकार आपली भूमिका स्पष्ट  करीत नसल्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी 19 जुलै रोजी भायखळा ते आझाद मैदान अशा भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी आंबेडकरी  कार्यकर्त्यांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून मुंबईतील आंबेडकरी मोहल्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकींचा जोर वाढला आहे.
कोणतीही पूर्वपरवानगी किंवा माहिती न देता एका मध्यरात्री खासगी गुंड उभे करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेली ‘बुद्धभूषण प्रिटिंग’ प्रेस  आणि ‘आंबेडकर भवन’ वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून आंबेडकरी जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड संतापाचे  वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून विविध राजकीय संघटना तसेच फुले-आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या संघटना रस्त्यांवर उतरून सरकारविरोधात  आंदोलन करू लागल्या आहेत.
या घटनेनंतर राज्यातील फडणवीस सरकारने बोटचेपी भूमिका घेतली असून ही घटना म्हणजे दोन गटांमधील वाद असल्याचे सरकारमधील काही लोक खासगीत  बोलू लागले आहेत. त्यामुळे संतापलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरत तात्काळ या प्रकरणाबाबत  आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बुलडोझर फिरवून उद्ध्वस्थ करू असा, इशारा देत 19 जुलैला  भायखळा ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा आयोजित केला आहे.