देबडवार-हांडे-चव्हाण यांच्या उघड चौकशीला प्रारंभ
सार्वजनिक बांधकाम : तक्रारदारांकडून लोकायुक्तांना तपशीलवार शपथपत्र सादर
मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 08 - सार्वजनिक बांधकाम खात्याचा निधी कुरतडणार्या देबडवार-चव्हाण-हांडे टोळीची उघड चौकशी करण्याची प्रक्रिया लोकआयुक्त आणि लोक उपायुक्त कार्यालयाने सुरू केली आहे. यासाठी आवश्यक असलेले शपथपत्रही तक्रारदारांनी लोकायुक्तांना सादर केले आहे.या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, माजी साबांमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्याकाळात काही क्षेत्रीय अभियंत्यांनी मंत्र्यांसह परस्परांमध्ये संगनमत करून साबांचा लोकहिताच्या कामांचा निधी परस्पर
लाटण्याचे कुकर्म करून कोट्यवधीची रक्कम हडप केली. या टोळीत भुजबळांचे हस्तक म्हणून काम करणारे विद्यमान मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण आणि अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या क्षेत्रीय अभियंत्यांनी तत्कालीन कार्यक्षेत्रात भुजबळांच्या मर्जीतील कंत्राटदारांवर विशेष मर्जी दाखवितांना शासकीय नियमावलीला फाटा दिला. नेहमीच्या नोंदणीकृत कंत्राटदारांना कामे वाटप करण्याऐवजी संबंधीत क्षेत्रीय अभियंत्यांनी ठरविलेल्या देवाण-घेवाण दराला मान्यता असलेल्या ठेकेदारांना कामे वाटप करणे, प्रसंगी नाते संबंधातील व्यक्तींच्या नावावर कामांचे बेकायदेशिर वाटप करणे, एकाच व्यक्तिला वेगवेगळ्या नावावर कंत्राट देणे चेन करून इतर कंत्राटदारांना काम वाटपापासून वंचित ठेवणे, कामांचे तुकडे पाडून (डळिर्श्रीीिं) जवळच्या आणि देयकांत भागीदारीचा वाटा देणार्या कंत्राटदारांना काम देणे अशा प्रकारची अनियमितता देबडवार-चव्हाण-हांडे या टोळीने संगनमताने आणि जाणीवपूर्वक केल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात तपशीलवार पुरावे हाती आल्यानंतर अशोक सोनवणे यांनी 2 मार्च 2016 रोजी लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाने 15 जून 2016 रोजी पाठविलेल्या पत्रात अशोक सोनवणे यांना पुराव्याच्या तपशिलासह आरोपांच्या समर्थनार्थ शपथपत्र सादर करण्यास सांगीतले होते. या अनुषंगाने अशोक सोनवणे यांनी गुरूवार दिनांक 7 जुलै रोजी शपथपत्र सादर केले आहे. या शपथपत्रात देबडवार, चव्हाण आणि हांडे यांनी साबांत अनियमितता कशी केली? या गैरप्रकारातून मिळालेल्या काळ्या संपत्तीचा विनियोग कसा केला? या तिन्ही क्षेत्रीय अभियंत्यांनी कुठे कुठे कुणाकुणाच्या नावावर चल-अचल संपत्ती खरेदी केली याचा सविस्तर तपशील नोंदविला आहे. (क्रमशः)
