Breaking News

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार!

बारामती, दि. 06 - धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. यापुढचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहे.  त्यामुळे धनगर समाजाला अपेक्षित आरक्षणाची मागणी पूर्ण करू, असे अभिवचन देतानाच आमदार नितेश राणे यांनी आरक्षणाची लढाई अधिक तीव्र करायला हवी,  असा इशारा दिला.
बारामती येथे आयोजित पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 29
1व्या जयंतीनिमित्त ‘विकास प्रतिष्ठान’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी  व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, आमदार रामहरी रूपनर, आमदार रामराव वरकुटे, अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना पाटील, सनी  पाटील, प्रदीप कुंठे, गोपीचंद पडरकर, प्रकाश शेडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आजचे सरकार मुहूर्त काढणा-यांचे सरकार आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन देणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सोयीस्कर शब्द फिरवला आहे. कॅबिनेटच्या 90 बैठका होऊनसुद्धा आरक्षण देऊ शकलेले नाहीत. मुळात हे सरकार चालवणा-या ‘आरएसएस’ला आरक्षण द्यावे,  असे वाटतच नाही. त्यामुळे आरक्षणाची मागणी करताना संघर्षाची धार तीव्र करावी लागेल, असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ‘आदर्श राज्य कारभार’ कसा चालवावा, लोक कल्याणकारी राज्य कारभार कसा चालवावा, याचा आदर्श घालून दिलेला  आहे. पुरुषांपेक्षा सरस राज्य कारभार स्त्री करू शकते हे भारत देशाला दाखवून दिले. आपल्यासारख्या तरुणपिढीतील कार्यकर्त्यांनी पुढच्या पिढीला  अहिल्यादेवींची कार्यपद्धती सांगितली पाहिजे, असे राणे म्हणाले. भाजप-शिवसेना सरकारची भूमिका नेहमीच दुटप्पी असते.
एकीकडे आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करायचे, तर दुसरीकडे आंबेडकर भवन पाडायचे, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करायची आणि  दुसरीकडे केंद्र सरकारला धनगरांना आरक्षण देताच येणार नाही, असे पत्र पाठवायचे. हा प्रकार म्हणजे या सरकारचे दाखवायचे दात वेगळे आहेत.