Breaking News

म्हाडा सोडत : घरांसाठी 29 हजारहून अधिक अर्ज

मुंबई, दि.06 - म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे मुंबईच्या विविध भागांतील 972 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षातील सोडतीतील घरांच्या  संख्येशी तुलना करता यंदा प्रथमच सोडतीत घरांचा आकडा कमी आहे.
घरांसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन आठवडे झाले असता घरांसाठी 29 हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सोमवारी  सायंकाळपर्यंत 29 हजारहून अधिक अर्जदारांनी घरासाठी अर्ज केला असून त्यापैकी सहा हजारहून अधिक अर्जदारांनी अनामत रक्कम भरत सोडत प्रक्रियेत  आपला प्रवेश निश्‍चित केला आहे.
म्हाडाच्या सोडत संकेतस्थळावर 23 जून रोजी दुपारी 2 वाजल्यापासून अर्जदारांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर 24 जूनपासून घरासाठी  ऑनलाईन अर्ज भरण्याची तसेच ऑनलाईन आणि डीडीद्वारे अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रक्रिया सुरू होऊन दोन-तीन दिवस उलटल्यानंतर हजारो अर्जदारांच्या उडया पडल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत 40 हजारहून अधिक अर्जदारांनी नोंदणी अर्ज  भरला असून त्यापैकी 38 हजारहून अधिक अर्जदारांची यशस्वी नोंदणी झाली. अर्जामध्ये फोटो योग्यरित्या अपलोड न केल्याने तसेच पॅन क्रमांक चुकीचा  टाकल्याने दोन हजारहून अधिक अर्जदारांच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या आहेत.