Breaking News

विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

सांगली, दि. 19 - दुळगाव (ता. तासगांव) येथील उत्तम डुमल या शेतकर्‍यांचा शेतात भांगलण करत असताना विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार  धक्का बसून मृत्यू झाला. वीज कंपनीची चूक असल्याचे सांगत ग्रामस्थांनी पंचनाम्यास अटकाव केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. धुळगाव (ता.  तासगांव) येथील उत्तम दत्ताजीराव डुबल हे आपल्या कुटुंबासह पुणे येथे स्थायिक आहेत. त्यांची धुळगाव येथील शेरीनाल्याजवळ शेती आहे. शेतात पेरणी  करण्यासाठी ते गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गावाकडे आले होते. उगवून आलेल्या पिकात ते भांगलण करत होते. त्यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या खांबावरील तारेचे  चिनीमातीचे इन्सुलेटर फुटले होते. त्यामुळे विद्युत प्रवाह खांबामध्ये आला. डुबल यांचा हात खांबाला लागल्याने विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही  बाब लक्षात आल्यानंतर वीज कर्मचार्‍यांनी तात्काळ धाव घेऊन विद्युत प्रवाह खंडित केला. यानंतर पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिस व वीज कर्मचार्‍यांना  ग्रामस्थांनी अडवले. या घटनेमध्ये महावितरणची चुक असून, तसा पंचनामा करण्याची मागणी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. वीज अभियंत्यांनी समजूत  काढल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.