Breaking News

रत्नागिरीतील एकही आमदार मंत्री बनण्यास लायक नाही : निलेश राणे

रत्नागिरी, दि. 10 - भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा ठेंगा दिला असून जिल्ह्यातील एकही आमदार मंत्री बनण्यास लायक नसल्याचे भाजपाने दाखवून दिले आहे, अशी खरमरीत टीका रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाचे प्रश्‍न प्रलंबित असताना जिल्ह्यातील शिवसेना-भाजपाचे आमदार आपली ताकद दाखविण्यात कमी पडत आहेत, हेही यामुळे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याला आवश्यक असणारी भूमिका सभागृहात मांडताना हे आमदार कधीच दिसले नाहीत.
त्यामुळे इथले मच्छीमारांसह महामार्ग, रेल्वे दुपदरीकरण, उद्योग-व्यवसाय, रोजगार यांबाबतचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेना-भाजपाबरोबर सेटलमेंट करत आहे. त्यांना नागरिकांच्या प्रश्‍नांचे, समस्यांचे काहीही देणे-घेणे नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
सत्ता मिळवण्यासाठी कोकणातील ब-याच गोष्टींचा दिखाऊपणा शिवसेनेच्या याच आमदारांनी केला आणि जनतेची दिशाभूल केली. खोटी आश्‍वासने देऊन निवडून आलेले सेनेचे हे आमदार मंत्री बनण्यास लायक नसल्याचेच सिद्ध झाले आहे, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
भाजपा आणि सेनेतील अंतर्गत लढाईमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक, आथक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास खुंटत चालला आहे, असेही निलेश राणे यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात रत्नागिरी जिल्ह्याला ठेंगा! जिल्ह्यातील एकही आमदार मंत्री बनण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध!