Breaking News

बचतीवरील उच्च व्याजदरांना जेटलींचा तीव्र विरोध

ूनवी दिल्ली, दि. 10 - खासगी गुंतवणुकीने जोर धरलेला नसताना बचतीवरील उच्च व्याजदरांमुळे कर्जाचे दर वाढत असून अर्थव्यवस्थेची वाढ संथगतीने होत  असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
देशांतर्गत अल्पबचतींवरील अत्यंत उच्च व्याजदर हेच भारताचे वैशिष्टय राहिले आहे, असे जेटली म्हणाले. उच्च परतावा देणारे आणि उच्च व्याजदराची व्यवस्था  आणण्यासाठी साधन म्हणून देशांतर्गत बचतीचा उपयोग करायचा आणि अर्थव्यवस्थेला सुस्त बनवायचे की फंड्स, रोखे, समभाग अशा साधनांपासून उच्च परतावा  मिळवायचा, असा प्रश्‍न जेटली यांनी केला. मुंबई शेअर बाजाराच्या 140व्या वर्षपूर्तीनिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. अर्थव्यवस्थेचे  मूलतत्वच गुंतवणूक आहे, जी उपलब्ध असलेल्या स्रेतांमधून येणार आहे, असे जेटली यांनी सांगितले.
फंड्स, रोखे यात सुरक्षित गुंतवणूकही आहे,ज्यातून लोकांना चांगला परतावा मिळतो. जगभरातील पेन्शन फंड्स याच आधारावर चालत आहेत. येत्या अनेक वर्षात  हीच प्रगतीची क्षेत्रे आहेत, असेही जेटली यांनी सांगितले.
अनेक दशकांपासून पायाभूत सुविधा आणि औद्योगिकीकरणातील तूट भरून काढण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घ कालावधीसाठी खूप मोठया गुंतवणुकीची  गरज आहे, असेही ते म्हणाले आणि त्याचा प्रारंभबिंदू हा गुंतवणूक आहे, जी साधनसंपत्ती वाढवणारी असेल. खासगी क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या आणि काही  वेळा सरकारी-खासगी भागीदारी याने ही तफावत भरून काढली जाईल. यासंदर्भात बीएसई ही महत्त्वपूर्ण संस्था आहे, असे कौतुक जेटली यांनी केले.
गेल्या काही वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा चांगला विकास झाला आहे; परंतु तो वाढीव सार्वजनिक गुंतवणूक आणि एफडीआयमुळे आहे. खासगी क्षेत्राचे त्यातील  योगदान अद्याप दिसायचे आहे. मागणीचा अभाव हेच कारण खासगी गुंतवणूक न येण्यासाठी आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले. यंदा पावसाची मेहेरबानी चांगली  होणार असल्याने ग्रामीण भागात मागणी वाढेल आणि त्यातून खासगी क्षेत्राला संधी उपलब्ध होईल, असेही जेटली यांनी पुढे सांगितले.