Breaking News

तळेगावात गिरीश बापट यांच्या हस्ते जेनेरिक मेडिसिन स्टोअरचे उद्घाटन

पुणे, दि. 09 - स्वातंत्र्यसैनिक स्व. नथूभाऊ भेगडे पाटील सेवा न्यास संस्थेच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते श्री द्रोणागिरी औषधालय - जेनेरिक मेडिसिन स्टोअर या माफक दरात औषधे व रुग्णोपयोगी साहित्य विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
हा कार्यक्रम गुरुवारी (दि.7) पार पडला. यावेळी मावळचे आमदार संजय भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, नगराध्यक्षा शालिनी खळदे, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, पक्षप्रतोद बापूसाहेब भेगडे, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, किसान संघाचे शंकर शेलार, माजी नगराध्यक्ष सुरेश शहा, रवीन्द्रनाथ दाभाडे, बबनराव भेगडे, डॉ. अशोकराव निकम, तालुका संघचालक विनोद मेहता, भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, नगरसेवक गणेश भेगडे, चंद्रकांत शेटे, सुनील शेळके, रघुवीर शेलार, इंदर ओसवाल, नगरसेविका सुजाता खेर, निलिमा दाभाडे, शुभांगी शिरसाट शिक्षण मंडळ सभापती दिनेश शहा, विश्‍व हिंदू परिषद तालुका मंत्री ह.भ.प. गणेश महाराज जांभळे आदी उपस्थित होते.
यावेळी स्व. नथुभाऊ यांच्याबद्दल मनातील आठवणी जागवत गिरीश बापट म्हणाले की, भाऊंचे आदर्श विचार, आचार व उत्कट सेवाभाव आणि समाजाभिमुख केलेले काम आजही तळेगाववासीयांसाठी जीवन कसे जगावे यासाठी मार्गदर्शक आहे. भाऊंनी केलेल्या रुग्णसेवेचा आदर्श जोपासून न्यासाद्वारे सुरु होत असलेल्या श्री द्रोणागिरी औषधालय, स्वस्त औषधी सेवा - जेनेरिक मेडिसिन स्टोअर या सेवाभावी उपक्रमाला शुभेच्छा देताना जेनेरिक औषधांच्या वापरामुळे नागरिकांच्या पैशांची बचत होणार आहे म्हणून शासनाच्या मार्फत यासाठी धोरण बनवण्याचे आश्‍वासन त्यांनी सर्व उपस्थितांना दिले.
तसेच माजी आमदार कृष्णराव भेगडे, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, बबनराव भेगडे व नगरसेवक गणेश भेगडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी न्यासाच्या वतीने देवदूत पुरस्कार प्राप्त डॉ. अशोकराव निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन श्रीकांत मेढी यांनी केले. स्वागत संजय बावीसकर यांनी तर प्रास्तविक न्यासाचे संस्थापक संतोष भेगडे (पाटील) यांनी केले. भाऊंच्या जीवनपटाचे वाचन विनया केसकर यांनी केले व आभार रविंद्र माने यांनी मानले.