Breaking News

पीएमपीएमएल चा कारभार पाहण्यासाठी आयएएस दर्जाच्या आधिकार्‍याची नेमणूक करावी ः महापौर

पुणे, दि. 09 - पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. यामुळे त्यांच्या जागी राज्य शासनाने आयएएस दर्जाच्या आधिकार्‍याची नेमणूक लवकरात लवकर करावी, अशी मागणी  महापौर प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पुणे शहरातील पीएमपीएमएल सक्षम व्हावी नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळावी त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन काम करताना दिसते. या करिता राज्य शासनाने श्रीकर परदेशी यांच्याकडे पीएमपीएमएलची जबाबदारी दिली होती. त्यांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम केली. मात्र त्याच काळात पंतप्रधान कार्यलयात त्यांना बढ़ती मिळाली. त्यांच्यानंतर पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती केली. त्यांनी देखील श्रीकर परदेशी यांच्यासारखे काम करीत ही गाडी रुळावर आणली. मात्र त्यांची देखील नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. या निर्णयावर अनेक नागरिक आणि स्वंयसेवी संस्थानी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पीएमपीएमएलचा कारभार पाहण्यासाठी राज्य शासनाने त्वरित आयएएस दर्जाच्या आधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, या मागणीची दखल राज्य शासनाने त्वरित घेऊन सक्षम आधिकारी पुणे महापालिकेला द्यावा, असे त्यांनी सांगितले आहे.