Breaking News

जिल्हा हागणदारी मुक्तकरण्याचे ग्रामसेवकांसह पदाधिकार्‍यांना आदेश

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या 15 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच 2 ऑक्टोबरपर्यंत पुर्ण सातारा जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकोप्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
पाटण व कराड पंचायत समितीमध्ये त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. त्यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. या बैठकीला पाटण पंचायत समितीच्या सभापती सुनिता पुजारी, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, रवि शिवदास, पाटण गटविकास अधिकारी किरण गौतम, गटविकास अधिकारी कराड अविनाश फडतरे उपस्थित होते. भंडारे यांनी यावेळी विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.
डॉ. देशमुख म्हणाले, येत्या 15 ऑगस्टपर्यंत जास्तीत-जास्त ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी ग्रामसेवक तसेच पदाधिकार्‍यांनी जास्तीत-जास्त कुटूंबाना भेटी द्याव्यात, संपर्क अधिकारी नेमावेत, निधी वाटपाची प्रक्रीया सुलभ करावी, पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी वाटचाल करावी.
14 व्या वित्त आयोगातील निधी तसेच अन्य योजनातील निधी तातडीने खर्च करावेत. याची जबाबदारी संबंधितांवर राहील. निधी खर्च न झाल्यास संबंधित शाखा अभियंता, ग्रामसेवक यांच्यावर कारवाई प्रस्थापित करण्यात येईल.
तालुक्यातील काही गावे निवडून डास मुक्तीसाठी बंदीस्त गटार योजना, घनकचरा निर्मूलन आणि मोठ्या प्रमाणात पूर्नभरणाची कामे करण्याबाबत आराखडा तयार करावा. वसुली वाढविण्याबरोबर जलयुक्त शिवारामधील कामे तसेच ग्रामविकासातील कामे व्यवस्थित करण्याबाबत डॉ. देशमुख यांनी सूचना दिल्या.