Breaking News

फडणवीसांची ‘पाटील’की बदनामी करण्याचा डाव

सार्वजनिक बांधकाम :  कुलकर्णी-देबडवार, चव्हाण-हांडे यांची कपटनीती चव्हाट्यावर

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 14 - आग लागल्यानंतर धुर दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वणवा पसरल्याशिवाय राहात नाही. भुजबळ क्लिन चीट  अहवालाच्या आगीचा वणवाही पसरू लागला असून या वणव्यात तत्कालीन अप्पर मुख्यसचिवांसह संबंधित क्षेत्रीय अभियंत्यांच्या कुकर्मावरील आच्छादन खाक  होऊन उघडे पडणारच असे संकेत मिळू लागले आहेत.
भुजबळ यांना घोटाळ्यातून निर्दोष ठरविण्यासाठी अप्पर मुख्य सचिवांपासून कार्यकारी
अभियंत्यांपर्यंतच्या क्षेत्रीय अभियंत्यांनी केलेले प्रयत्न चव्हाट्यावर  आल्यानंतर आनंद कुलकर्णी, उल्हास देबडवार, अतुल चव्हाण, रणजीत हांडे यांनी मी नाही त्यातली... अशी भुमिका घेण्यास सुरूवात केली. खरे तर जेव्हा  एसीबीनें घोटाळ्याशी संबंधित अहवाल मागविला तेव्हाच या मंडळींनी संगनमत करून बनावट अहवाल तयार केला होता. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा कपटी  उद्देश नजरेसमोर ठेवून आनंद कुलकर्णी, उल्हास देबडवार, अतुल चव्हाण रणजीत हांडे या मंडळींनी क्लीन चिट अहवाल तयार केला.
बनावट अहवाल आहे तसा स्वीकारला गेला तर भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यात निर्दोष ठरतील. भुजबळांच्या खाल्लेल्या अन्नाला जागल्याचे समाधान मिळवित  त्यांच्या उपकाराची परतफेड करता येईल. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साबांमंत्री यांनी राजकीय आकस ठेवून छगन भुजबळ यांच्यावर खोटे आरोप  लादले, त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र केले असा ठपका भाजपवर ठेवला जाईल. अहवाल नाकारला गेला तरी विद्यमान शासनाचीच  नाचक्की होईल. भुजबळांना दुसर्‍या बाजूने शासनच संरक्षण देत असल्याची टिका होईल असे वातावरण तयार होईल. चीत आणि पट दोन्हीवर कमांड ठेवण्यासाठी  तयार केलेला हा अहवाल हत्यार म्हणून वापरण्याचा या मंडळींचा डाव होता. तथापि हा डाव उलटण्याचे संकेत मिळताच या मंडळींनी बचावात्मक पवित्रा घेण्यास  सुरूवात केली. कायद्याच्या आसुडाचे फटके पाठीवर पडण्याची शक्यता लक्षात येताच ही कावेबाज मंडळी पुन्हा एकत्र आली आणि अप्पर उपसचिव राज  गायकवाड यांनी हा अहवाल पाठविला अशी भुमिका घेतली. तथापि या प्रकरणाशी अप्पर सचिवांचा सुतराम संबंध नाही. तर आनंद कुलकर्णी, उल्हास देबडवार,  अतुल चव्हाण आणि रणजीत हांडे या मंडळींचाच कावा आहे याचा सबळ पुरावा असलेला शासकीय दस्त उपलब्ध झाला आहे काय आहे हा दस्त पाहु या उद्याच्या  अंकात.
कॅटच्या निशाण्यावर असलेला
तो कार्यकारी अभियंता कोण?
भिवंडी-चिचोंडी आणि सायन पनवेल महामार्गाच्या टेंडर प्रकरणी एक कार्यकारी अभियंता कॅटच्या निशाण्यावर आहे. 2007 आणि 2009 या दोन्ही वर्षात या दोन  महामार्गाचे टेंडर निघाले. नेमक्या दोन्ही वेळी हा एकच कार्यकारी अभियंता कार्यरत होता आणि नेमक्या टेंडर वितरण प्रक्रियेदरम्यान तो बेपत्ता झाला. कॅटने या  प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कोण आहे तो कार्यकारी अभियंता? कुणाच्या सांगण्यावरून तो दोन्ही वेळेला अनुपस्थित राहीला? भुजबळ परिवार आणि  साबांतील भुजबळ हस्तकांशी त्या कार्यकारी अभियंत्यांचा संबंध काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे कॅटच्या अहवालात नमुद आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशन काळात  करूया, या कार्यकारी अभियंत्यांचा ‘लक्ष्यवेध’