
जाती व्यवस्थेचा इतिहास पाहता सांस्कृतिक बाजूने अधिक जावे लागते. संस्कृतीचा हा संबंध इतिहास पाहत असताना मात्र आपणास जात म्हणजे काय याचा उलगडा होत नाही. आपण जे काही इतिहास म्हणून पाहतो ती सांस्कृतिक परंपरा असते किंवा जात या व्यवस्थेतील लक्षणे दिसतात. जात म्हणजे नेमके काय? आपणास हे देखिल माहीत आहे की, जाती व्यवस्था ही विषमतेने ग्रासलेली एक उतरंड आहे. यालाच क्रमिक असमानता असेही म्हटले गेले. तरीही सामान्यपणे हा प्रश्न शिल्लक राहतोच की जात म्हणजे काय? जाती व्यवस्थेचा आधार वर्ण व्यवस्था आहे. वर्ण हे चार गटात विभागले आहेत. या वर्णामध्येच क्रमिक असमानता असल्याने त्यातून निर्माण झालेली जातीव्यवस्था देखील विषम आणि उतरंड असलेली आहे. आम्ही जेव्हा आमच्या जातीचा प्रवर्ग उच्चारतो तेव्हा तो वर्ण असतो. आज ओबीसी हा समुदाय प्रवर्ग आहे. परंतु या व्यवस्थेत शूद्र वर्ण म्हणून गणल्या गेलेल्या समुदायाचा अविभाज्य भाग असणार्या जातींचा गट आज इतर मागासवर्गीय किंवा ओबीसी प्रवर्ग म्हणून गणला जातो. या प्रवर्गातही काही जाती निश्चित तुलनेने प्रगत आहेत तर काही जाती या फारच अप्रगत. जातींची ही प्रागतिकता आणि अगतिकता इतिहासात त्या जातींच्या स्थानावरुनच ठरली. ब्राह्मणी व्यवस्थेने वरच्या तीन वर्णांना जाती बहाल करतांना त्यांना काहीशी प्रतिष्ठाही मिळवून दिली. परंतु शुद्र वर्णात असणार्या ज्या जाती शूर, कर्तृत्त्ववान, वैभवशाली होत्या त्यांना तितका खालचा दर्जा दिला. जाती व्यवस्था पूर्व इतिहासात ज्या जातीचे वर्चस्व शूरत्व, वैभव जेवढे अधिक तेवढाच त्या जातींचा त्या जातींचा जातीव्यवस्थेत खालचा दर्जा ठरला. कारण ब्राह्मणी संस्कृतिला ठाऊक आहे की कर्तृत्वशाली समुदायाला जेवढे दाबून ठेवता येईल तेवढे चांगले. कारण या जातीतील लोकांचे अंगभूत कौशल्याने व्यवस्थेत ते पुन्हा वरचे स्थान आपल्या कर्तृत्त्वाने मिळवू शकतील, ही साधार भीती ब्राह्मणी व्यवस्थेला तेव्हाही होती आणि आजही आहे. त्यामुळे विकासाच्या संधीची व्यापकता मंडल आयोगाने निर्माण करुन देताच ब्राह्मणी संस्कृती बिथरली. परंतु डावपेच करणार नाहीत ते ब्राह्मण कसले! त्यामुळे मंडल लागू होताच त्यांनी तो अंमलात येवू नये यासाठी प्रयत्न केलेत. परंतु ओबीसी समाजाची संख्या आणि राजकीय जागृती पाहता त्यांनी धूर्तपणे विषय हाताळले. त्यासाठी त्यांनी आरक्षण किंवा प्रतिनिधीत्वच निकाली काढले. जागतिकीकरण आणि खासगीकरणाची पायाभरणी करुन त्यांनी प्रतिनिधीत्व नाकारले. तर राजकारणात थेट आणण्यापेक्षा ओबीसी समुदायाला वेगवेगळ्या ब्राह्मणी संघटनांना धर्माचे वलय देवून त्यांनी ओबीसींना आपलेसे केले. त्याचा परिणाम आज जे ओबीसी साध्वी किंवा महाराज भाजपच्या सत्तेत दिसत आहेत तो त्याचा परिणाम आहे. एखाद्या ओबीसीला राजकीय नेता बनवून त्याच्या संघटन कौशल्यातून ओबीसी जातींना जवळ करायचे. त्यातून राजकीय सत्ता मिळवायची राजकीय सत्तेत एखाद्या ओबीसीला मंत्रीपद द्यायचे आणि त्यांना अडचणीचे वाटेल तेव्हा त्या नेत्याला बदनाम करुन किंवा अन्य मार्गाने हटवायचे. हा ब्राह्मणी डाव इतिहासापासून आजपर्यंत कायम आहे. याचे कारण ब्राह्मणी संस्कृतीला त्यांचे जात वर्चस्व हवे! हे जात वर्चस्व म्हणजे काय तर जन्माने श्रेष्ठतमं ठरविण्याची प्रक्रिया. पण तरीही जात म्हणजे नेमके काय? तर एका शब्दात सांगायचे तर जात म्हणजे जन्म! जन्माने श्रेष्ठत्व ठरविण्याच्या या प्रक्रियेला आता पूर्वाश्रमीच्या शूद्रांनी व आजच्या ओबीसींनी हद्दपार करावे!