Breaking News

उद्यापासून विधिमंडळ अधिवेशन

मुंबई, दि. 17 -  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकारी बाकावरील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री आणि  दामदुप्पटीने वाढलेली महागाई या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर सत्ताधारी पक्षाला घेरण्याची विरोधी पक्षांनी पूर्ण तयारी केलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही  पक्षांच्या ज्येष्ठ आमदारांकडून त्याचप्रमाणे तरुण आमदारांच्या आक्रमक मा-यामुळे सरकार हैराण होणार आहे.
चिक्कीपाठोपाठ घरपोच आहार योजनेतील 12 हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा पंकजा मुंडे यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या हातात मिळालेला मोठा पुरावा  असून, त्याचवेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्यामुळे विरोधी पक्षाचे लक्ष्य ठरतील. नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट  यांच्यावर लोकायुक्तांनी ठपका ठेवला असून, डाळींचे वाटप करण्यात हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच रवींद्र वायकर यांच्यावर आरे  कॉलनीतील जमीन हडप केल्याचा आरोप आहे.
विधान परिषदेत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या आगमनामुळे विरोधी पक्षाची शक्ती आणि आत्मविश्‍वास मोठया प्रमाणात वाढला असून, नारायण राणे यांच्या  अभ्यासू आणि आक्रमक हल्ल्यांमुळे सरकार अगोदरच हादरलेले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधान सभेतील ज्येष्ठ नेते जयंत पाटील या दोघांच्या  कामगिरीकडेही जाणकारांचे लक्ष लागलेले आहे.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर एसआरए योजनेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी एसीबीने गुन्हा नोंदविल्याचे प्रकरण आणि तुरडाळीच्या किंमतीवरुन  लोकायुक्तानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीस आदी मुद्दे विरोधकांकडून तापवले जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या येण्याने काँग्रेसची वाढलेली ताकद आणि त्याचवेळी भाजपाकडून राष्ट्रवादीचे विधानपरिषद  विरोधीपक्षनेते धनजंय मुंडे आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांची काही प्रकरणे बाहेर काढून राष्ट्रवादीला दाबण्याचा सुरू असलेला प्रयत्न पाहता यावेळी  दोन्ही सभागृहात काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.