Breaking News

गजानन पाटील लाचप्रकरणात एकनाथ खडसेंना एसीबीकडून क्लीन चीट

मुंबई, दि. 17 - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कथित पीए गजानन पाटील याने घेतलेल्या लाचप्रकरणी शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून  (एसीबी) क्लीन चीट देण्यात आली. एसीबीकडून विशेष न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रामध्ये एकनाथ खडसे  यांच्या नावाचा उल्लेख नाही.
त्यामुळे या प्रकरणातून निर्दोष सुटण्याचा एकनाथ खडसेंचा मार्ग मोकळा झाला आहे. एसीबीच्या या क्लीन चीटमुळे एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे  मानले जात आहे. गजानन पाटीलला खडसेंच्या मंत्रालयातील दालनातून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र एसीबीच्या
आरोपपत्रात खडसेंचे मंत्रालयातील दालन  असा उल्लेख न करता मंत्रालय असा उल्लेख करण्यात आला आहे. 1 हजार पेक्षा जास्त पानांचे हे आरोपपत्र आहे. फक्त गजानन पाटील यालाच फक्त आरोपी  करण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली असे स्पष्ट होत आहे. एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी आरोपांच्या भोवर्‍यात  अडकल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खडसे यांच्यावरील आरोपांच्या मालिकेला गजानन पाटील लाचप्रकरणापासूनच सुरूवात झाली होती.  याप्रकरणात खडसे यांना यापूर्वीच लोकायुक्तांकडून क्लीन चीट देण्यात आली होती. पाटील याने लाच मागितल्याच्या प्रकाराशी खडसे किंवा त्यांच्या कोणत्याही  कर्मचार्‍याचा संबंध नसल्याचे स्पष्ट करीत लोकायुक्त एम एल ताहलियानी यांनी ही तक्रारच बंद करून टाकली होती. निळजे येथील जमीन सामाजिक संस्थेसाठी  देण्याकरिता 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार घेऊन रमेश जाधव यांनी सप्टेंबरपासून एसीबीचे दरवाजे ठोठावले होते.