Breaking News

काश्मीरमध्ये संचारबंदी कायम !

हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा पुर्ववत 

श्रीनगर, दि. 10 -  ‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुरहाण वणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खोर्‍यात उफाळलेल्या हिंसाचाराच्या घटना रविवारी देखील सुरु असल्याने संचारबंदी कायम आहे. मात्र, हिंसाचारानंतर स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा रविवारी पुन्हा सुरू करण्यात आली असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काश्मीरमधे भेट परिस्थितीचा आढावा घेतला. 
दरम्यान काश्मिरमधील संतप्त जमावाने एका पोलीस अधिकार्‍याची गाडी झेलम नदीत ढकलून दिली असून, यामध्ये त्या पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू झाल्याचे वृत्त राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिले आहे. काश्मीर खोर्‍यात ठिकठिकाणी एकत्र आलेल्या जमावाने मोठया प्रमाणावर हिंसाचार व जाळपोळ केली. त्यांनी अचबाल व दमहाल हांजीपोरा ही पोलीस ठाणी पेटवून दिली, तर काझीगुंडच्या कुंड येथील एका पोलीस चौकीलाही आग लावली. या प्रकारांनंतर तीन पोलीस बेपत्ता आहेत. खबरदारी म्हणून  मोबाईल, इंटरनेटसेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांना मदतीसाठी केंद्रीय पथकाला पाचारण करण्यात आले होते.  कुलगाम, अनंतनाग, त्राल, कोकेरनाग आणि श्रीनगरमधील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे,
अशी माहिती काश्मीर विभागाचे आयुक्त असगर हुसैन समून यांनी दिली. लोकांना शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन समून यांनी केले आहे. शनिवारी जवान व संतप्त जमावामध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत 12 जण ठार, तर 50 जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी तीन पोलिस स्थानकांसह पाच इमारतींना व वाहनांना आग लावली. फुटीरतावादी नेत्यांनी शनिवारी बंद‘ पुकारला होता. श्रीनगरसह अन्य भागांत संचारबंदीसारखे निर्बंध घालण्यात आले आहेत.