Breaking News

राज्यात पावसाचे थैमान !

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस !
कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात पूर परिस्थिती

मुबंई, दि, 10 - राज्यभर मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली असून, दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे विविध जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. 
मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी साठयात मोठया प्रमाणात वाढ झाली असून, प्रथमच पाणी पात्राबाहेर आले आहे. धरणक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामूळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन कोल्हापूरातील राजाराम बंधार्‍याची पाणीपातळी 29 फूट 4 इंचावर पोहचली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर व भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, खडक कोगे व सरकारी कोगे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत  पुण्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून गेल्या 24 तासांत टेमघरमध्ये 106 मिमी, पानशेत प्रकल्पात 74 मिमी, वरसगाव 73 मिमी आणि खडकवासला धरणात 17 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. कोयना धरणातील पाणी पातळी गेल्या 24 तासांत 2 टीएमसीने वाढली असून 29 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी येत आहे.
नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नाशिकसह इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्‍वर या भागांमध्ये जोरदार पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच गंगापुर आणि दारणा धरणातील पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरण 36 टक्के तर दारणा धरण 42 टक्के भरले आहे. तर भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर रतनगड येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवार सकाळ सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार घाटघरला 360 मिमी तर रतनवाडीला 315 मिमी पावसाची नोंद  झाली असून, साकुर-मांडवे पुलापर्यंत पाणी पोहोचले असून, संगमनेर व पारनेर तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. हरिश्‍चंद्रगड परिसरात मुसळधार आषाढ सरी कोसळत असून मुळे नदीला मोठा पूर आला आहे. भंडारदरा धरणात गेल्या 24 तासात एक टी एम सी म्हणजे 1 हजार दशलक्षघनफुट विक्रमी  पाण्याची वाढ झाली आहे. भंडारदरा धरण सायंकाळपर्यंत 40 टक्के भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणाचा पाणी साठा 850 दशलक्षघनफुट इतका झाला आहे.