Breaking News

वृक्षारोपणाची चळवळ व्यापक होणे गरजेचे

। आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन

अहमदनगर, दि. 08 - गो ग्रीन संस्था शहरात वृक्षारोपणासाठी व वृक्षांचे संवर्धनासाठी चांगले काम करीत आहे. आतापर्यंत 1200 झाडे लावून ती जगविली आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त विशाल पवार याने संकल्प केल्यानुसार 221 रोपे या संस्थेस दिली आहेत. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले. मात्र, त्यानंतरचे मोठे काम गो ग्रीन पूर्ण करणार आहे. शहरातील तरुण एकत्र येऊन सामाजिक कार्य करीत आहेत, ते नक्कीच प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे. वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या संकल्पानुसार विशाल पवार यांच्या वतीने गो ग्रीन संघटनेस 221 रोपे आ. जगताप यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक कैलास गिरवले, धनेश कोठारी, अ‍ॅड. प्रसन्ना जोशी, संभाजी पवार, मनीष फुलडहाळे, अतुल डागा, सुशील ओस्तवाल, तुषार लोढा, सनय ताथेड, कुणाल कोठारी, महेश भुतकर, विरेंद्र पितळे, अमोल वैद्य, विकास गिते, विकास सुराणा, सतीश शिरसाठ, आदित्य शहा, सिद्धांत कुमट, यश कोठारी, नितीन भंडारी, शैलेश संभार आदी उपस्थित होते.
धनेश कोठारी म्हणाले की, गो ग्रीन संस्थेच्या नावातच सर्वकाही आहे. वृक्षारोपणात लोकसहभाग असल्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. हे आम्ही जाणतो. त्यामुळेच आम्ही झाडे लावल्यानंतर त्याची काही दिवसांनी जाऊन पाहणी करतो. तसेच रस्त्याकडेऐवजी कॉलनी व नागरिक वास्तव्यास आहेत, अशा परिसरात वृक्ष लावून त्याला जगवण्याची जबाबदारी लोकांवर सोपवतो. लोकांना यामध्ये सहभागी करून घेऊन नगर शहराचा संपूर्ण परिसर गो ग्रीन करण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले.
विशाल पवार म्हणाले की, वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा आपण वृक्षारोपणाची चळवळ व्यापक व्हावी, यासाठी प्रयत्न करणार्‍या गो ग्रीन संस्थेस वृक्षांची भेट दिली. त्यामुळे एक वेगळेच समाधान मिळाले. यापुढील काळात अजूनही चांगले व सामाजिक उपक्रम राबवू, असे ते म्हणाले.