भारतीय स्टेट बँकेचे आर्थिक क्षेत्रात बहुमोल योगदान ः प्रवीण करडे
। वर्धापनदिनानिमित्त नय्यर विद्यालयास शालेय साहित्याची भेट
अहमदनगर, दि. 08 - भारतीय स्टेट बँकेने आर्थिक क्षेत्रात योगदान देतानाच अनेकांना कर्जरूपी मदत करून स्वतःच्या पायावर उभे केले आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत राबवून प्रत्येक नागरिकाला बचतीची सवय लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत. हे करीत असताना सामाजिक जाणिवेचे भान कायम ठेवत व सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक भावनेतून समाजकार्य सुरू ठेवले आहे. भारतीय स्टेट बँकेची नगरची मुख्य शाखा आपला 61वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. याचे औचित्य साधून दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्यालयास शालेय साहित्याची भेट देण्यात आल्याचे प्रतिपादन बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर प्रवीण करडे यांनी केले.भारतीय स्टेट बँकेच्या 61व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्यालयास शालेय साहित्याची भेट श्री. करडे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका मंदा हांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दीपक लिमकर, वैभव रत्नपारखी, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
करडे पुढे म्हणाले की, विद्यालयास गरज असलेले लोखंडी कपाट, ग्रंथालयाचे व खेळाचे साहित्य बँकेच्या वतीने भेट देण्यात आले. बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून अशाप्रकारे विद्यालयांना मदत करण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.
मुख्याध्यापिका मंदा हांडे म्हणाल्या की, भारतीय स्टेट बँकेने अनेकांचे संसार उभे केले आहे, अनेकांना आधार दिला आहे. सामाजिक कार्यात बँक अग्रेसर आहे. बँकेने नय्यर विद्यालयास गरज असलेले साहित्य भेट दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे सांगितले.
