Breaking News

पारनेर पोलिस ठाण्यासमोर महिलांचे ठिय्या आंदोलन

पारनेर (प्रतिनिधी) । 19 - तालुक्यातील जवळे येथे दारूबंदी व अवैध धंद्यांविरोधात लढा देणारे रामदास घावटे यांना दारूविक्रेत्यांकडून मारहाण करुन त्यांच्याविरुध्द अँट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ जवळे व निघोज येथील महिला व कार्यकर्त्यांनी पारनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. दारूबंदीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
जवळे व निघोज येथे दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमकपणे लढा देत आहेत. जवळे येथील दारूबंदी चळवळीचे प्रमुख रामदास घावटे यांनी दोन आठवड्यापूर्वी दारूबंदी व अवैध धंद्यांविरोधात उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणामुळे पोलिसांना रोज अवैध धंदे व दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी लागत आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी घावटे यांनी जवळे येथील एका दारूविक्रेत्याचा अडा पोलीस अधिकार्यांना दाखविल्यानंतर पोलिसांनी तो दारूअड्डा उद्ध्वस्त केला होता. मात्र शुक्रवारपासून रामदास घावटे यांना धमक्यासह मारहाण करण्यापर्यंत अवैध धंदेवाल्यांची मजल गेली. शनिवारी घावटे यांच्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते संतप्त झाले. रविवारी सकाळी दारूबंदी चळवळीचे प्रमुख बबन कवाद, गजानन सोमवंशी, भूमिपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल देठे, शिबवा संघटनेचे अनिल शेटे, गणेश शेटे, कांता लंके, रंजना पठारे, पुष्पा वराळ, सनिषा घोगरे आदींसह महिलांनी पारनेर पोलीस ठाणे गाठले.
रामदास घावटे यांच्यावर दारूविक्रेते खोट्या फिर्यादी देत असून त्यांना मारहाणही करीत आहे. यामुळे दारूबंदी व अवैध धंद्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असून संबंधितांवर कारवाई करावी व घावटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदार भारती सागरे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी चर्चा करून याबाबत योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदेालन मागे घेण्यात आले.