Breaking News

बँकांनी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ः जिल्हाधिकारी

उद्दिष्ट पूर्ण न केल्यास बँकाविरूद्ध दंडात्मक कारवाई

बुलडाणा, दि. 17 - जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या संततधार पावसामुळे खरीपाची पेरणी जवळपास पूर्णत्वाकडे आल्या आहेत. या हंगामात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मागील वर्षीच्या कटू आठवणी विसरून जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा उमेदीने शेती करीत आहे. त्यासाठी त्याला पीक कर्जाची आवश्यकता आहे. बॅकांनी त्यांना दिलेल्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्टानुसार संपूर्ण कर्ज वितरण करावे. ज्या बँका संपूर्ण कर्ज वितरण करणार नाही, अशा बँकाविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी  आज दिले.
विविध राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकेच्या प्रतिनिधीसोबत पीक कर्ज वितरणाबाबत आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमाने, नाबार्डचे सुभाष बोंदाडे, जिल्हा उपनिबंधक डी. एम पालोदकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खरात, स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री. परब आदींसह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण न करणार्‍या बँकाविरोधात सक्ती करताना जिल्हाधिकारी म्हणाले, यावर्षी मान्सून चांगला असल्याचे चिन्ह पहिल्या टप्प्यातील पावसाने दाखवून दिले आहे. त्यामुळे कदाचित हे वर्ष शेतकर्‍यांना फलदायी ठरणार आहे. अशा वर्षात बँकांनी शेतकर्‍यांना पीक कर्ज वितरण व पुनर्गठण करून सहकार्य करावे. जेणेकरून शेतकरी खरीप हंगाम घेताना आर्थिक अडचणीत येणार नाही.
यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 1 लक्ष 4 हजार 550 शेतकर्‍यांना 709.28 कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. तसेच 34 हजार 479 शेतकर्‍यांचे 2015-16 या आर्थिक वर्षाच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या वर्षामध्ये 44 हजार 373 शेतकर्‍यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण करून पीक कर्ज घेतले आहे.