‘पीस टीव्ही’वर बंदी; मग सूदर्शन टीव्हीवर का नाही : दिग्विजय सिंह
पुणे, दि. 18 - झाकीर नाईक यांच्या भाषणावर व ‘पीस टीव्ही’वर बंदी घातली जात असेल, तर हिंदू समाजाच्या भावना भडकवणा-यांवर आणि ‘सूदर्शन टीव्ही’वरही बंदी का नको, असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला. झाकीर नाईकची भाषणे भडकावू आहेत, असे सरकारचे म्हणणे असेल, तर मग दोन वर्षे सरकार झोपले होते का? असा टोलाही त्यांनी लगावला.‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चे झाकीर नाईक काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात साडपले आहेत. प्रत्येक मुस्लिमाने दहशतवादी बनावे, हे त्यांचे विधान, बांगलादेशसह अनेक भागांतील त्यांचा वाढत प्रभाव या पार्श्वभूमीवर झाकीर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
त्यांच्याबाबत बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, झाकीर नाईक यांना मी भेटलो आहे. ते इस्लाममधील योग्य विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्यांनी शांतीचा संदेश दिला आहे. तरीदेखील सरकारला झाकीर नाईक यांच्याबाबत आपत्ती आहे. त्यांचे भाषण भडकावू आहे, असे सरकारचे म्हणणे असेल, तर मग दोन वर्षे सरकार झोपले होते का? तेव्हाच सरकारला हे का कळले नाही? त्यांची भाषणे यूटयूबवर आणि पीस टीव्हीवर सुरू होती.
झाकीर नाईक मुस्लिमांना भडकवत असल्याच्या कारणावरून त्यांच्या भाषणावर सरकारने बंदी घातली आहे. ते मुस्लिमांना भडकवतात, असे सरकारला वाटत असेल, तर मग हिंदूंना भडकवणारेदेखील अनेक जण आहेत. त्यांच्यावरदेखील सरकारने कारवाई करावी. मोदी असीमानंद, आसाराम बापूंना भेटतात. त्यांच्या पाया पडतात. त्याचे काय? असा टोलाही त्यांनी लगावला.