पाणी कपात कायम; दररोज पाणी पुरवठा प्रश्नावरील बैठक निष्फळ
पुणे, दि. 19 - यंदा धरणे 52 टक्के भरली असल्याने नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी सर्वांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्नावर आज (सोमवार )दुपारी महापालिकेत महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मात्र बैठक निष्फळ ठरली असून, दररोज पाणी पुरवठ्यासाठी पुणेकरांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार. पाणी कपात बंद करून दररोज पाणी पुरवठा प्रश्नी आजची सर्व साधारण सभा चांगलीच गाजली. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेने तीव्र आंदोलन केले. ‘महापौर पाणी द्या’ अशा घोषणा नगरसेवकांकडून करण्यात आल्या आहेत. सभेत राष्ट्रवादीकडून पालकमंत्री आणि प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. मात्र गटनेत्यांची ही बैठक निष्फळ ठरली असून पाणी कपात अद्यापही
कायम राहणार आहे.
पाणीकपात रद्द करण्याचा निर्णयाचा चेंडू जिल्हाधिका-यांकडे टोलवण्यात आला आहे. ‘पाणीकपात मागे न घेण्यामागे राजकीय गणितं’ आहे, असा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला. महापौर प्रशांत जगताप यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच दौंडला पाणी सोडताना आयुक्त गप्प का होते ? असा सवालही महापौरांनी यावेळी आयुक्त कुणाल कुमार यांना केला.
तर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी भविष्याचा विचार करून धरणातील पाणीसाठा 20 टिएमसी होईपर्यंत एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जावा, अशी मागणी केली.