Breaking News

विंबल्डन रॉजर फेडरर तिसर्‍या फेरीत

लंडन, दि. 01 -  सात वेळचा विजेता रॉजर फेडरर याने बुधवारी विंबल्डन स्पर्धेत पहिल्या फेरीपासून चर्चेत राहिलेल्या यजमान देशाच्या मार्क्स विलिसची घोडदौड दुसर्‍याच फेरीत रोखली. फेडररने 6-0, 6-3, 6-4 असा सहज विजय मिळविला.
जागतिक क्रमवारीत 772 व्या स्थानावर असणार्‍या विलिसने दुसरी फेरी गाठून इतिहास नोंदवला होता. पण, दुसर्‍या फेरीत त्याच्यासमोर थेट फेडररचे आव्हान होते.
हौशी टेनिसपटूंना धडे देणार्‍या विलिसने दुसरी फेरी गाठली आणि त्याची लढत फेडररशी निश्‍चित झाली, तेव्हा याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र फेडररने सलग तिन्ही सेट जिंकले आणि सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध केले
पहिला सेट त्याने अवघ्या 25 मिनिटांत जिंकला. विलिसला एकही गेम जिंकता आली नाही. पण, त्यानंतर 25 वर्षीय विलिसने आपल्या मित्रांच्या जोरदार पाठिंब्याच्या जोरावर थोडा तग धरला. बंद कोर्टवर त्याने काही चांगले फटके मारले. तिसर्‍या सेटमध्ये त्याने ड्रॉप शॉट्स आणि स्लाईस शॉट्सने फेडररला कोर्टवर पळवले. पण, त्याचे आव्हान तेवढ्यापुरतेच ठरले. फेडररला 5-4 अशा स्थितीत सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी मिळाली आणि त्याने तिचा फायदा उठवून विजयावर शिक्कामोर्तब केले.