क्लीन चीट अहवालाचे पितृत्व कुणाकडे?
सार्वजनिक बांधकाम : देबडवारांना होतेय उपरती; पापाचे खापर हांडेंच्या माथी
मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 12 - मस्तीतून मुजोरी आणि मुजोरीतून शिरजोरी निर्माण होते. या शिरजोरीची नशा कळत नकळत पापाला जन्म देते. पाप परिणाम दाखवायला लागले की मग भान जागे होते तथापि तोपर्यंत आपल्या पापाने अनिष्ट परिणाम साधलेला असतो. थोडक्यात बैल गेल्यानंतर झोपा करण्यात कुठलेच हशील उरत नाही. मग फक्त पश्चातापाने छाती बडविणे एव्हढेच शिल्लक राहते. नागपुरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार हे याच मनोवस्थेपर्यंत पोहचल्याचे अधिकृत वृत्त हाती आले आहे.महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी इडीग्रस्त झालेले छगन भुजबळ यांचे पाप झाकण्यासाठी क्षेत्रीय अभियंत्यांनी क्लीनचिट अहवालाचा केलेला बनाव चांगलाच अंगलट आल्यानंतर ही मंडळी आता भानावर येऊन पश्चातापदग्ध मनोवस्थेत जगत आहे. ‘हे पाप माझे नाही तर त्याचे आहे’ अशा ढकलगाडीचा खेळ खेळून प्रशासनाची दिशाभूल आणि स्वमनाचे समाधान करीत आहेत.
अगदी ताजे वृत्त, सोमवार दि. 11 जुलै 2016, सकाळची वेळ, साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निवासस्थान मुख्य अभियंता उल्हास देबडवार अन्य काही साबां अभियंत्यांसोबत चर्चा करतांना आपल्या कृत्यावर पश्चाताप व्यक्त करतांना दिसले. उल्हास देबडवार हे स्वतःला निर्दोष सिध्द करतांना क्लीनचीट अहवालाचे सारे पाप अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्या माथ्यावर झटकतांना साबांच्या अन्य अभियंत्यांनी पाहिले. देबडवार म्हणतात अतुल चव्हाण यांनी माझी दिशाभूल केली, मला अंधारात ठेवून माझी स्वाक्षरी घेतली. देबडवार यांची बालीश धडपड बरेच काही सांगून जाते. खरेतर देबडवार सारखा चाणाक्ष माणूस दिवसाउजेडी काय अंधारातही फसणार नाही. थोडक्यात सकाळच्या त्या वातावरणात इतर अभियंत्यांनी देबडवार यांची ती सारवासारव करमणुक म्हणून चांगलीच एन्जॉय केली. अतुल चव्हाण यांनी देबडवार यांची फसवणुक केली असे देबडवार म्हणतात तर इकडे अतुल चव्हाण देखील क्लीन चिट अहवालाची घाण आपल्या अंगाला लागू देण्यास तयार नाहीत. चव्हाण म्हणतात तो क्लीन चीट अहवाल अधिक्षक अभियंता (तत्कालीन कार्यकारी अभियंता) रणजीत हांडे यांनी तयार केला. देबडवार, चव्हाणांच्या पदराआड लपतात तर चव्हाण हांडेच्या नावावर हे पाप खपवू पाहतात खरे तर देबडवार-चव्हाण आणि हांडे हे तिनही क्षेत्रीय अभियंते एकाच माळेचे मणी असून छगन भुजबळ यांच्या उपकारातून उतराई होत असतांनाच विद्यमान मुख्यमंत्री आणि साबांमंत्र्यांना बदनाम करण्याचा त्यांचा समान हेतू आहे आणि त्यातूनच हे क्लीनचीट अहवालाचे बाळ जन्माला घातले तथापि एसीबी आणि महाराष्ट्र शासनाने बडगा उगारताच त्या बाळाचे पालकत्व हे तिघेही नाकारू लागले आहेत. देबडवारांना आताच पश्चातापाची उपरती का सुचली हे याचे कारणही तेव्हढेच रोचक आहे. (क्रमशः)
