धर्माविषयी चिंता आणि चिंतन
जगात साधारणत: तीन हजार वर्षांपूर्वी पर्यंत मानवी संस्कृती अस्तित्वात होती. मात्र इसवीसनपूर्व पाचव्या शतकापासून साधारणत: धर्माचा उदय होवू लागला. आज जगातील प्रत्येक धर्म हा त्याच्या अनुयायांना सनातन करु पहात असल्यामुळे धर्माच्या पुरोगामीपणाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. त्यामुळे जगभर धर्माविषयी चिंता आणि चिंतन मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतीय संस्कृती ही साधारणपणे पाच हजार वर्षांच्या ज्ञात इतिहासाची आहे. प्रामुख्याने शेतीच्या संशोधनानंतर उदयास आलेली संस्कृती संपन्न करण्याचा प्रयत्न इथल्या कृषक आणि कारागिर वर्गाने मोठ्या प्रमाणात केला. भारतीय संस्कृतीत एकाबाजूला परक्या देशातून आलेले आर्य आणि त्यांचा सामना करणारे मुळ भारतीय यांची संस्कृती अनुक्रमे पशुपालक आणि कृषक समाजाची होती. येथिल कृषक समाज हा त्याच्या शेतीविषयक संस्कृतीला सर्वोच्च स्थान देत होता. परंतु धर्माच्या उदयानंतर या संपन्न समाजाच्या संस्कृतीला दहाव्याशतकात साधारणत: ब्राह्मणी संस्कृतीचे आक्रमण पूर्णपणे झाले. त्यापूर्वी ब्राह्मण समुदायाशी असणारा संघर्ष हा ब्राह्मण विरुध्द बहुजन किंवा ब्राह्मणी संस्कृती विरुध्द अब्राह्मणी परंपरा असा होता. परंतु दहाव्या शतकात ब्राह्मणी संस्कृतीने अब्राह्मणी समुदायाला सांस्कृतीक बाबींच्या अनुषंगाने धर्माकडे वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नातून हिंदु बहुजनांची संस्कृती बाराव्या शतकात धर्मविरहीत पध्दतीने सक्रिय झाली. त्यातून संत समुदायाच्या विविध पंथांचा उदय झाला. वास्तविक आज इतिहास म्हणून अस्तित्वात असणारे पंथ हे धर्माचे प्राबल्य नाकारणारेच होते. कारण पंथांनी मानवता आणि समता या मुल्यांची जपणूक करत माणसाला स्वातंत्र्यही बहाल केले. परंतु धर्म हा ब्राह्मणी संस्कृतीने नियमांचे अवडंबर करुन मानवी समाजाला त्याची जगण्याची प्रक्रिया अवैज्ञानिक तरी करुन सोडली किंवा मानवता आणि समतेची मुल्ये तरी नाकारण्यात आली. अशा दोन्ही बाजूने हिंदु बहुजन समाजाच्या सांस्कृतीक र्हासाची सुरुवातही या काळात आणखी वेगाने झाली. प्रत्येक संत आपला विचार मांडतांना येथे अस्तित्वात असणारी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेने नाकारलेले माणूसपण यावर परखड भाष्य करीत होते. त्यांची भाषा ही चिंतनात्मक आणि साधनेतून आलेली भाषा असल्यामुळे तिच्यात एक ममत्व कायम राहिले. त्यामुळे बर्याचवेळा संतांची भाषा ही बंडखोरीची किंवा क्रांतीची भाषा नाही असा आरोप साहित्यातील काही तथाकथित तज्ञ मंडळी करीत असत. परंतु संत तुकारामांपासुन तर संत कर्ममेळांपर्यंत सर्वच संतांनी वापरलेली भाषा ही खरे तर क्रांतीची भाषा होती. संतांचे विचार वारकरी संप्रदायांच्या माध्यमांतून पंढरपूरात दाखल होणारे जनसामान्य आपआपल्या गावापर्यंत वाहून नेत होते. पंढरपूरला येणारा वारकरी हा असा क्रांतीच्या विचारांचा वाहक बनला. तो केवळ तो विचार वांझोट्यापणे मांडत नव्हता तर कृतीही करत होता. म्हणून वारकरी संप्रदाय हा कृतीशील समतावाद्यांचा प्रवाहही होता. आज या वारकरी संप्रदायाचे स्वरुप पुन्हा एकदा बदलण्याचा प्रयत्न ब्राह्मणी धर्माने चालविला आहे. मध्ययुगीन काळात वावरणार्या संतांनी विचारांमध्ये कुठेही भेसळ होवू दिली नाही. कारण त्या काळात वैचारीक शुध्दता आणि आचरण जोपासण्याला सर्वोच्च प्राधान्य होते. परंतु आजच्या भौतिक विलासाच्या काळात तत्व आणि मुल्ये यांना मुरड घालून केवळ दैववादी बनविण्याचा प्रयत्न ब्राह्मणी संस्कृतीने चालविला आहे. त्यामुळे भौतिक संपन्नतेकडे म्हणजेच पैसा, प्रसिध्दी आणि प्रतिष्ठा या तीन बाबी ज्या दिशेला हाताला लागतील त्या दिशेने लोकांचा प्रवाह वळविण्याचे काम ब्राह्मणी संस्कृती आता जोमाने करु लागली आहे. राजकीय सत्ताकाळात या बाबी आणखी द्रुतगतीने करणे शक्य होते एवढेच या निमित्ताने म्हणता येईल.
