Breaking News

लोणावळा भाजप कार्यकर्त्यांनी वीज वितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

पुणे, दि. 12 - लोणावळा उप विभागीय वीज विरतण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत आज लोणावळा शहर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वीज वितरणच्या सर्व अधिकार्यांना कार्यालयातून बाहेर काढत कार्यालयाला टाळे ठोकले. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने काही काळ वीज वितरण कार्यालयाबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 
लोणावळा वीज वितरण कार्यालयाच्या वतीने पावसाळापूर्व कामे योग्य प्रकारे न केल्याने शहरात विजेचा लपंडाव सुरु आहे, तक्रार करण्यासाठी कार्यालयात फोन केल्यास कोणी अधिकारी फोन घेत नाही, वाढीव वीजबिले ही तर नित्याची बोंब झाली आहे. वारंवार निवेदने देऊन देखील अधिकारी दखल घेत नसल्याने आज भाजपने वीज वितरण कार्यालयावर अचानक मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकले.
यापूर्वी वीज वितरणचे उप अभियंता बागूल यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली. दहा ते पंधरा मिनिटात कार्यालयात येतो सांगून बागूल दोन तास कार्यालयात न आल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी हे टाळे ठोकले. या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसून लोणावळा उप विभागीय अधिकारी विनायक ढाकणे व आंदोलनकर्ते तसेच वीज वितरणचे अधिकारी यांची चर्चा सुरु आहे.