Breaking News

चारही धरणे 100 टक्के भरेपर्यंत शहराला दिवसाआड पाणी पुरवठा ः महापौर

पुणे, दि. 12 - पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात संततधार पाऊस आहे. ही धरणे शंभर टक्के भरेपर्यंत शहराला दिवसाआड पाणी पुरवठा राहणार, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खडकवासला धरण
(सोमवारी) दुपारी 12 वाजेपर्यंत 75% भरले होते. यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी खडकवासला धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलपूजन केले. यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठ्याचा आढावा देखील घेतला.
या विषयी महापौर प्रशांत जगताप म्हणाले की, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. तसेच खडकवासला धरण जवळपास 80 टक्के भरले असून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नदी पात्र किंवा कॅनॉलमध्ये पाणी सोडले जाणार आहे. यामुळे नदी काठच्या भागात राहणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन त्यांनी यावेळी केले.
शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात जवळपास 11 टिएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणी पुरवठा न करता दररोज पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली. यावर महापौर प्रशांत जगताप म्हणाले की, शहरात आणि धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असला तरी भविष्याचा विचार करता धरणे 100 टक्के भरेपर्यंत शहराला दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. यामुळे या गंभीर प्रश्‍नी राजकारण होता कामा नये, असे त्यांनी सांगितले.