Breaking News

मराठवाडा वगळता राज्यात दमदार पाऊस

पुणे, दि. 05 - दोन दिवसांच्या संततधारेनंतर पावसाने सोमवारी दुपारनंतर विश्रांती घेतली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला धरणांत सोमवारी सकाळपर्यंत एकूण 3.90 टीएमसी पाणीसाठा झाला होता. अवघ्या चार दिवसांत शहराला 100 दिवस पुरेल इतके पाणी धरणात जमा झाले आहे. मराठवाडा वगळता राज्यातील सर्व भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. पुढील दोन दिवस तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत 1 जुलै रोजी 1.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. हा साठा सोमवारी सकाळी 3.90 टीएमसी झाला. धरणाच्या पाणीसाठयात 2.53 टीएमसीने वाढ झाली आहे. पुण्याला दररोज 40 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता असते. गेल्या 24 तासांत खडकवासला येथे 94 मिमी, पानशेतला 120 मिमी, वरसगावला 122 मिमी आणि टेमघर येथे 158 मिमी पाऊस पडला. सतत कोसळणा-या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठयात वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 157 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 471 मिमी एवढया पावसाची नोंद करण्यात आली.
धरणातील आजअखेर 20 टक्के एवढा पाणीसाठा तयार झाला आहे. तर गेल्या 24 तासांत पवना धरणातील पाणी साठयात पाच टक्क्यांनी, तर गेल्या तीन दिवसांत पाणीसाठयात 10 टक्के एवढी वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणात प्रतिसेकंदास 22 हजार 540 क्सुसेक पाण्याची आवक झाली. पश्‍चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी दमदार पाऊस कोसळत असल्याची आकडेवारी आहे.
परिणामी सर्वच जलसाठयांत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. तर सततच्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. पश्‍चिम भागासह जिल्ह्याच्या दुष्काळी माण, खटाव तालुक्यात ही पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. हा पाऊस खरिप हंगामासाठी उपयुक्त असल्याचे कृषी अधिका-यांनी नमूद केले. दरम्यान, पश्‍चिम भागात गेल्या तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे पेरणीसह शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत.
सातारा शहराची वर्षभर तहान भागवणा-या कास तलावाची यंदा सर्वोच्च पाच फुटापर्यंत पातळी खालवली होती. तथापि गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने तलावात कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी पाण्याची पातळी 16 फुटापर्यंत वाढली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पावसाचा जोर कायम राहिल्यास दरडी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या खंडाळा आणि लोणावळा भागात जोरदार पाऊस सुरू आहे. हा पाऊस असाच सुरू राहिल्यास घाटात दरडी कोसळण्याची भीती आहे. दरडी कोसळण्याचा धोका खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरडी कोसळू नयेत, यासाठी गेल्या महिन्यात विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. मागील वर्षी जुलै महिन्यातच द्रुतगतीवर दरड कोसळल्याने मोठा अपघात घडला होता. आता पुन्हा एकदा दरड कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे.
गेल्या 72 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे व पिपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विस्कळीत झालेला वीजपुरवठा रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत करण्यात आला. इंद्रायणी नदीवरील वडगाव-शिंदे बंधा-यात रविवारी सायंकाळी मासेमारीसाठी बंधा-यावर गेलेल्या अमिन शेख, दीपक शिंदे या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमिन आणि दीपक दोघे एकाच परिसरात राहत होते. बंधा-यात पाणी अचानक वाढल्याने ते दोघेही बुडाले.