Breaking News

संत चळवळीला बहुजन विचारवंतांची गरज...

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हिंदु बहुजन समाजाची अध्यात्मिक परंपरा गेली आठशेवर्षे अबाधित राहीली आहे. या परंपरेनुसार सध्या पंढरपूरच्या  वाटेने निघालेल्या दिंड्या या तुकोबारायांच्या परंपरेनुसार अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या दिंड्या या केवळ टाळ-मृदुंग  घेवून जाणार्‍या दिंड्या यापूर्वी नव्हत्या आणि या पुढील काळातही त्यांना तसे स्वरुप येवू द्यायचे नसेल तर अलिकडच्या काळात पुणे आणि परिसरात ज्या  अपरंपरागत दिंड्या सुरु आहेत त्यांना ओळखावे लागेल. ही ओळख करुन घेण्याचीही काही सुत्रे आहेत. त्यानुसार ज्या वारकरी दिंड्यांमध्ये संत चळवळीचा विचार  प्रकटपणे सांगितला जातो आणि त्या विचारांच्या अनुषंगाने पंढरपूरच्या विठोबाने सामाजिक अन्याय दूर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. याउलट ब्राह्मणी  पध्दतीने सुरु करण्यात आलेल्या नव्या दिंड्यांमध्ये संत विचारांना थारा नाही. समतेचा विचार मांडणारी ही चळवळ केवळ ईश्‍वरी अवतारात गुंतविण्याचा प्रयत्न  केला जात आहे. या प्रत्यत्नांना तथाकथित संत चळवळीचे मानले जाणारे विचार म्हणून शेषराव मोरे हे भलत्याच पध्दतीचे विचार मांडत आहेत. संत चळवळ  आणि त्याचे अभ्यासक म्हणवून घेत असतांनाही ऐतिहासिक विचारवंत म्हणून कोणतीही तटस्थता किंवा न्याय्य बाजू त्यांच्या विचारात दिसत नाही. याउलट संत  चळवळीचे आणि वारकरी संप्रदायाचे विकृतीकरण कसे करता येईल यासाठी ते आता विचार मांडू लागले आहेत. शेषराव मोरे यांची विचारवंत म्हणून पूर्ण हयात  ब्राह्मणी विचारांच्या जोपासणीत गेली आहे. ज्या-ज्या ठिकाणी हिंदु बहुजनांचा विचार ब्राह्मणी संस्कृतीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जातो त्या-त्यावेळी शेषराव  मोरे यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यामुळे हे संत चळवळीचे अभ्यासक नसुन ब्राह्मणी संस्कृतीचे हस्तक आहेत. विचारवंतांनी कोणत्याही पध्दतीने तटस्थता  सोडली तर त्यांना विचारवंत कसे म्हटले जावू शकते? यावरही आता गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. संत चळवळ अपवाद वगळला तर हिंदु  जातीसमाजातून पुढे आलेल्या बहुजन संतांची चळवळ आहे. त्यामुळे आता संत चळवळीचा अभ्यास करण्यासाठी हिंदु बहुजन समाजातील अभ्यासक पुढे येण्याची  गरज आहे. या विचारवंतांमध्ये सर्व जातींच्या संतांनी मांडलेल्या समतेच्या विचारांची नव्या परिस्थितीचे आकलन करुन मांडणी करण्याची गरज आहे. त्याशिवाय  संत चळवळीला ब्राह्मणी संस्कृतीकडे वळविण्याचा जो प्रयत्न केला जात आहे तो थांबविला जावू शकत नाही. म्हणूनच आज वारकरी संप्रदायाचा अभ्यास  करण्यासाठी नवे हिंदु बहुजन विचारवंत पुढे येण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सद्या पंढपूरच्या दिंड्या सुरु असतांनाच मुस्लिम समुदायांचाही रमजान महिना सुरु  आहे. पंढपूरच्या विठोबाच्या पुजेसाठी आणि त्यांचा विचार प्रचारीत आणि प्रसारीत करण्यासाठी अनेक मुस्लिम संतही पंढरपूरात दाखल होत असत. ही परंपरा पुढे  चालविण्यासाठी या दोन्ही धर्मात समन्वयाची भूमिकाही नव्या परिस्थितीत वारकरी संप्रदायावर येवून पडली आहे. कारण वारकरी चळवळ ही समतेची चळवळतर  आहेच पण तितकीच ती मानवतावादाची चळवळ आहे. या चळवळीने बाराव्या शतकापासुन महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात समतेचा विचार प्रसारीत करण्याचा वसा  घेतला आहे. या चळवळीला समृध्द करणारे बहुजन विचारवंत जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतील. कारण ब्राह्मणी संस्कृती ही आपला विचार रेटण्यासाठी  जाणीवपूर्वक हस्तक निर्माण करत असतो आणि त्या हस्तकांना कधी विचारवंत तर कधी वेगवेगळी संबोधने देवून प्रसिध्दी करुन पुढे आणले जाते. ब्राह्मणी  समाजाच्या या नितीला समजून घेतल्याशिवाय आम्ही वारकरी संप्रदायाची चळवळ वाचवू शकत नाही. त्यामुळे संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी बहुजन  विचारवंत जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतील.