मुख्य अभियंत्यांच्या पाठींब्यावर अधिक्षक अभियंत्यांचा जातीयवाद
सार्वजनिक बांधकाम : विभागीय चौकशीसह एसीबीमार्फत चौकशी करण्याची मागणी
औरंगाबाद, विशेष/प्रतिनिधी, दि. 05 - अधिक्षक अभियंता ए.बी. सुर्यवंशी यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांची विभागीय. तसेच एसीबी मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी मंगळवारी शिवक्रांती युवा सेना धरणे आंदोलन करणार आहे. दरम्यान, मुख्य अभियंता प्रविण भिडे यांचा पाठींबा असल्यामुळे सुर्यवंशी आणि कंपनीचे (अ) नैतिक मनोबल वाढल्याची चर्चा असून मागासवर्गीय अभियंत्यांचाही मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्यात लॉबीचे राजकारण अजूनही सुरूच असून त्याचे लोण औरंगाबाद साबांमडळापर्यंत पोहचले आहे. ए.बी.सुर्यवंशी यांनी औरंगाबाद साबांमंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर या साबांमंडळात भ्रष्टाचार, लाचखोरी, अनियमितता असे गैरप्रकार वाढीस लागले या शिवाय जातीयवादही बोेकाळला असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ए.बी.सुर्यवंशी हे अधिक्षक अभियंता असले तरी कार्यकारी अभियंत्यांच्या विशेषतः खास मर्जीतील कार्यकारी अभियंता कार्यक्षेत्रात त्यांना विशेष स्वारस्य असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामागे नेमके रहस्य काय याविषयी वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात असले तरी भ्रष्टाचारावर सर्व तर्क जुळतात. कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांच्या कार्यक्षेत्रावर अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी यांचे विशेष प्रेम असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे कार्यक्षेत्र विधानसभा सभापती हरिभाई बागडे यांच्या कार्यक्षेत्रात असतांनाही अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने केलेला गैरकारभार अनियमिततेला कारणीभूत ठरला असून या भागातील कामांमध्ये तसेच देयके मंजूरी आणि अदा करण्यातही गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले जात आहेत. दरम्यान अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी जातीयवाद पोसत असल्याचीही चर्चा झडू लागली आहे. मागासवर्गीय अधिकार्यांना हजर करून घेण्यात ए.बी.सुर्यवंशी टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकारी अभियंता साळवे हे मागासवर्गीय आहेत म्हणून काही दिवस त्यांना पद्भार देण्यास सुर्यवंशी यांनी टाळले होते. दबाव आल्यानंतर त्यांना पद्भार दिला गेला. सुर्यवंशी यांना मुख्यअभियंता भिडे यांचा पाठींबा असल्याचाही आरोप होत आहे.
शिवक्रांती युवा सेनेचे आज विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने
औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम मंडळातील अधिकारी अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता श्री. शेंडे, कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शासकीय निधीचा संगनमताने व कट कारस्थानाने मजुर सहकारी संस्था तसेच ठेकेदार यांच्याशी हातमिळवणी करून न झालेल्या कामाची नोंद करून शासकीय देयके मंजूर केली तसेच देयके अदाही केली या प्रकरणी झालेल्या गैर व्यवहाराची खातेनिहाय व क्षेत्रीय पातळीवर विभागीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशा आशयाचे निवेदन शिवक्रांती युवा सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष परमेश्वर नलावडे पाटील व संस्थापक अध्यक्ष यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत 20112-13 मध्ये झालेल्या कुशल कामाचा लाभार्थ्यांना मोबदला मिळालेला नाही तोही मोबदला तात्काळ मिळावा यासाठी मंगळवार दि. 5 जुलै 2016 रोजी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर शिवक्रांती युवा सेनेच्यावतीने तिव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
