Breaking News

महसूल अधिकार्‍यांना टार्गेट करणार्‍या वाळू चोरांचा निषेध

 अहमदनगर (प्रतिनिधी) । 05 - कोपरगांव तहसीलदार तथा परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, नायब तहसीलदार शिरीष चिलवर यांच्यासह कर्मचार्‍यांविरुद्ध गौण खनिज आणि वाळू चोरांनी खोटे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. कोपरगावमधील महसूल अधिकार्‍यांवर सुमारे 18 खोटे गुन्हे दाखल केल्याचा निषेध महसूल संघटनेने केला. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन महसूल विभागातील अधिकार्‍यांना वेठीस धरणार्या या वाळू चोरांविरुद्ध कडक कारवाई व्हावी आणि महसूल अधिकार्‍यांना संरक्षण मिळावे यासाठी जिल्हा महसूल अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन दिले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील अहमदनगर जिल्हा महसूल अधिकारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेतली. उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणो, प्रांताधिकारी प्रकाश थविल, प्रांताधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी संदीप निचित, प्रांताधिकारी ज्योती कावरे, प्रांताधिकारी संतोष भोर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी गोविंद दाणोज, उपजिल्हानिवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार तथा परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार हेमलता बढे, तहसीलदार राजेश थोटे, तहसीलदार रोहिदास वारुळे, तहसीलदार सदाशिव शेलार, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार किशोर कदम, तहसीलदार सुभाष दळवी, नायब तहसीलदार वैशाली आव्हाड, नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत कैफियत मांडली.