Breaking News

मुख्यमंत्री फक्त सत्ता उपभोगत आहेत : नाराणय राणे

मुंबई, दि. 19 - फडणवीस सरकारच्या कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेले आहेत. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पंढरपूरला गेले होते. त्यांनी पांडुरंगाकडे सर्व राज्यांची जबाबदारी सोपविलेली दिसते आहे आणि मुख्यमंत्री फक्त सत्ता उपभोगत आहेत, अशा घणाघाती शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत गृहखात्याच्या चिंध्या चिंध्या केल्या.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे हात, पाय तोडण्यात आले, तिचे मुंडके तोडण्यात आले. या भीषण दुर्घटनेचे पडसाद आज विधान
मंडळात विरोधी पक्षाच्या बाकावरून स्थगन प्रस्तावातून जोरदारपणे उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या स्थगन प्रस्तावावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रस्तावाचे समर्थन करून सगळे कामकाज बाजूला ठेवण्याची मागणी केली. या प्रश्‍नी तातडीने चर्चा करा.
त्याशिवाय कामकाज करता येणार नाही. इतकी ही घटना गंभीर आहे, महाराष्ट्राला लाज आणणारी आहे, याची दखल आपण घेणार आहोत की नाही? असा तिखट प्रश्‍न सभापतींना विचारून नारायण राणे म्हणाले की, या सरकारला भावना नाहीत, संवेदना नाहीत, राज्यात आमच्या आया-बहिणी सुरक्षित नाहीत.
विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेत आज कर्जत येथील त्या भीषण बलात्काराचे आणि त्यानंतर त्या दुर्दैवी मुलीचे तुकडे करून ठार मारून टाकण्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे जोरदारपणे उमटले. विधान परिषदेचे नव्याने सदस्य झालेल्या नारायण राणे यांचा आज प्रत्यक्ष कामकाजाच्या दृष्टीने पहिलाच दिवस. महाराष्ट्राला हादरवून टाकणा-या या घटनेसंबंधात राणेसाहेब काय बोलतात, याकडे सगळया सभागृहाचे लक्ष लागलेले होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कामकाज स्थगित करून चर्चा?करण्याची मागणी केली तेव्हा सभापती रामराजे निंबाळकर यांनी मुंडे यांना रोखले आणि सांगितले की, माझ्याकडे नियम 289 प्रमाणे याच विषयात आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत.