Breaking News

पुन्हा विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार : नितेश राणे

मुंबई, दि. 19 - कोपर्डी बलात्कार व हत्येची घटना अत्यंत निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणारी आहे, याबाबत विधानसभेत चर्चा करण्यासाठी आपण स्थगन प्रस्ताव दिला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा करण्याऐवजी फक्त निवेदन केले आणि चर्चा टाळली. यावरून सरकार या प्रकरणी किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. आपण उद्या पुन्हा या प्रकरणी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार आहोत, असे आमदार नितेश राणे यांनी ठामपणे सांगितले.
इतकी गंभीर घटना घडूनही पीडित मुलीच्या घरी भेट देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, मात्र मातोश्रीवर जेवणाला जाण्यासाठी वेळ आहे, अशी टीका नितेश यांनी केली. सोशल मीडियावरून टीकेची झोड उठल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. गृहमंत्री असलेल्या
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नितेश राणे यांनी दिली. मुलीला न्याय मिळवून देईपर्यंत या प्रकरणी आवाज उठवू, असेही ते म्हणाले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात पाच आरोपी आहेत. इतरांना पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना त्वरित भेट देण्याऐवजी दोन दिवस केरळ, मग गोवा असे फिरत राहिले व नंतर सरतेशेवटी कोपर्डीला गेले, अशी टीकाही त्यांनी केली. आमदार नितेश राणे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाबाबत सर्व पक्षांच्या गटनेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले आहे.