पीक विम्याची भरपाई शेतक-यांच्या खात्यात त्वरित जमा करा
आ. हर्षवर्धन सपकाळांची रिझर्व बँकेकडे मागणी
बुलडाणा, दि. 14 - पीक विमा योजनेत बुलडाणा जिह्यातील 86 हजार 335 शेतक-यांना वंचित ठेऊन विमा कंपन्यांनी फसवणूक केली आहे. सदर बाब गंभीर असून दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या पार्श्वभुमीवर सर्व विमाधारक शेतक-यांना विम्याची भरपाई मंजूर करण्यात यावी. त्याचप्रमाणे 2 लाख 76 हजार 908 शेतक-यांसाठी मंजूर झालेली 184 कोटी 32 लाख रूपये तरतूद तातडीने शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश बँकांना देण्यात यावेत, अशी मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनुक्रमे रिझर्व बँकेच्या गव्हर्नर अरूंधती भट्टाचार्य व राज्याचे कृषि मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.
या संदर्भात आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, सन 2015-16 च्या हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील 3 लाख 63 हजार 243 शेतक-यांनी पीक विमा काढला होता. गेल्या तीन वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. सन 2015-16 मध्ये संपूर्ण जिल्ह्यातील आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आल्याने राज्य शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणुन घोषीत केला होता. या पार्श्वभुमीवर पीक विमा काढणा-या सर्व शेतक-यांना विमा कंपन्यांकडून भरपाई मिळणे आवश्यक होते. असे असतांना केवळ 2 लाख 76 हजार 908 शेतकरी विम्यासाठी पात्र ठरविण्यात आले असुन 86 हजार 335 शेतक-यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर पीक विम्यापोटी 184 कोटी 32 लक्ष भरपाई मंजूर करण्यात आली असुन सदर रक्कम ही दि. 31 मे 2015 रोजी सर्व संबंधीत बँकांना वर्ग करण्यात आलेली आहे. मात्र सन 2015-16 चा खरीप हंगाम लक्षात घेता अद्याप पर्यंत विमा धारक शेतक-यांच्या खात्यात सदर भरपाई जमा करण्यात आलेली नाही, ही अतिशय दुर्दैवी व गंभीर बाब असल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
विशेष उल्लेखनीय असे की, बुलडाणा जिल्ह्यातील 20 हजार कापूस उत्पादक शेतकरी सुध्दा पीक विमा भरपाई पासून वंचित ठेवण्यात आले असुन मोताळा ( 5579 ), जळगांव ( 2486 ) व चिखली ( 1891 ) या तीनही तालुक्यातील शंभर टक्के कापूस उत्पादक शेतक-यांना अपात्र ठरविण्यात आल्याबद्दल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा तालुक्यातील रायपूर महसूल मंडळातील एकही शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरविण्यात आलेला नसल्याबाबत लक्ष वेधले आहे.
मोताळा तालुक्यातील 17 हजार 84 शेतक-यांनी पीकांचा विमा उतरविला होता. त्यापैकी तालुक्यातील केवळ निम्म्या शेतक-यांनाच पात्र दर्शविण्यात आले असुन निम्मे अपात्र घोषीत करण्यात आले आहे. विशेष उल्लेखनिय असे की, मोताळा तालुक्यासाठी शेतक-यांनी 2 कोटी 80 लक्ष रूपये पीक विम्याचा हप्ता भरलेला असतांना केवळ 3 कोटी 18 लक्ष विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. ही एकप्रकारे पीक विमा योजनेत विमा कंपनीकडून शेतक-यांची झालेली घोर फसवणूक असल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान पीक विम्याच्या बाबतीत राज्यशासनाने तातडीने विमा कंपन्यांना जाब विचारून बुलडाणा जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असल्याने पीक विम्याच्या भरपाईतून वगळण्यात आलेल्या 86 हजार 335 शेतक-यांना पीक विम्याची भरपाई मंजूर करण्या बाबत संबंधीतांना निर्देश व्हावेत अशी मागणी राज्याचे कृषि मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे पीक विमा भरपाईपोटी मंजूर असलेली 184 कोटी 32 लक्ष रूपये तरतूद तातडीने संबंधीत पात्र शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याबाबत बँकांना निर्देश देण्याबाबतची मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिका-यांमार्फत रिझर्व बँकेच्या गव्हर्नर अरूंधती भट्टाचार्य यांचेकडे केली आहे.
