Breaking News

शासनाच्या आदेशाविरोधात सातार्‍यातील व्यापार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) - कृषी उत्त्पन्न पणन अधिनियमात केलेल्या सुधारणेस विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील अडत व्यापार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी छत्रपती शाहू फळे व भाजीपाला मार्केट अडत असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, तसेच फलटण, लोणंद, वाई, येथील फळे व भाजीपाला व्यापारी असोसिएशन आणि अडत व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात अडत व्यापार्‍यांनी म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर नियममुक्ती म्हणजे बाहेर खरेदी करणार्‍या व्यापार्‍याला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. हाच व्यवहार बाजार समितीच्या आवारात केल्यास त्याला कमिशन, मार्केट सेस, सुपर व्हीजन फी, हमाली, मापाडी आदी खर्च द्यावे लागणार आहेत. शेतकर्‍यांना रोख पैसे द्यायचे व माल उधार विकायचा इतका फरक राहिला, तर बाजार समितीतील व्यवहार बंद पडतील. पर्यायाने सर्व बाजार समितींचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
नियमनमुक्त कायदा बाजार समिती आवारात व्यापार करणार्‍यांसाठी लागू करावा, त्यातून बाहेरचे व्यापार्‍यांशी स्थानिक व्यापारी स्पर्धा करतील, शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव देता येईल.
बाजार समितीबाहेर नियमन मुक्ती कायदा सगळीकडे सारखाच करावा. जेणे करुन महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही. यावेळी मोठ्या संख्येने अडत व्यापारी उपस्थित होते.